‘हातकणंगले’ला संचालक पदाचा मार्ग सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:22 AM2021-04-26T04:22:32+5:302021-04-26T04:22:32+5:30

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : तब्बल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हातकणंगले तालुक्याला ‘गोकुळ’ संचालक पदाचा मार्ग सापडला. दोन्ही ...

‘Hatkanangale’ found its way to the post of director | ‘हातकणंगले’ला संचालक पदाचा मार्ग सापडला

‘हातकणंगले’ला संचालक पदाचा मार्ग सापडला

Next

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : तब्बल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हातकणंगले तालुक्याला ‘गोकुळ’ संचालक पदाचा मार्ग सापडला. दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारी देण्यात आल्याने तालुक्यातील दूध संस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जिल्ह्याच्या राजकारणाचे नेतृत्व हातकणंगले तालुक्याने केले आहे. स्वर्गीय बाळासाहेब माने, ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी खासदार निवेदिता माने यांच्याबरोबर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सक्षमपणे नेतृत्व केले. मात्र, ‘जिल्ह्याच्या राजकारणाची नाडी असणाऱ्या ‘गोकुळ’मध्ये आतापर्यंत केवळ तिघांनाच संधी मिळाली. यामध्ये तालुक्यातील ठरावांची संख्या हा अडसर असला तरी हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यांना एकच जागा देण्याचे धोरणही कारणीभूत ठरले आहे.

यावेळेला सत्तारूढ गटातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, तर विरोधी आघाडीकडून माजी आमदार सुजित मिणचेकर हे रिंगणात उतरले आहेत. दोन्ही उमेदवारी नेत्यांच्या घरातच गेल्याने सामान्य कार्यकर्त्यांत नाराजी आहे. मात्र, परिस्थितीच तशी निर्माण झाल्याने शह-काटशहाच्या राजकारणातून ही नावे पुढे आली. सत्तारूढ गटाकडून महाडिक कुटुंबातील कोणाला तरी संधी मिळणार हे निश्चित होते. मात्र, विरोधी आघाडीकडून विश्वास इंगवले यांचे नाव शेवटपर्यंत चर्चेत राहिले. मात्र, सुजित मिणचेकर यांच्या उमेदवारीसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केल्याने विरोधी आघाडीची गोची झाली.

आतापर्यंत यांनी केले प्रतिनिधित्व

संघाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तिघांनाच संचालक म्हणून संधी मिळाली. यामध्ये ज्येष्ठ नेते वसंतराव मोहिते, जे. आर. पाटील व अरुण इंगवले यांचा समावेश आहे.

कट्टर विरोधकाचा प्रचार

हातकणंगलेच्या राजकारणात आमदार राजू आवळे व माजी आमदार सुजित मिणचेकर हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. मिणचेकर हे उमेदवार असल्याने आमदार आवळे त्यांचा प्रचार करणार का? याविषयी तालुक्यात उत्सुकता होती. अखेर आमदार आवळे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचा आदेश मानून त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेत, मनाचा मोठेपणा दाखविल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Web Title: ‘Hatkanangale’ found its way to the post of director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.