LokSabha Result 2024: काळजाचा ठोका चुकवणारा ‘हातकणंगले’चा निकाल

By राजाराम लोंढे | Published: June 5, 2024 12:35 PM2024-06-05T12:35:07+5:302024-06-05T12:36:30+5:30

कमी मताधिक्यांमुळे शेवटपर्यंत माने-सरुडकरांमध्ये झुंज : विजयाचा लंबक आणि कार्यकर्त्यांची घालमेल

Hatkanangale Lok Sabha Constituency results are tight till the end | LokSabha Result 2024: काळजाचा ठोका चुकवणारा ‘हातकणंगले’चा निकाल

LokSabha Result 2024: काळजाचा ठोका चुकवणारा ‘हातकणंगले’चा निकाल

राजाराम लोंढे/आयुब मुल्ला

कोल्हापूर : महाराष्ट्रात सर्वाधिक काटाजोड लढत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झाली. पहिल्या फेरीपासून काळजाचा ठोका चुकवणारे मताधिक्य धैर्यशील माने व सत्यजीत पाटील-सरुडकर यांच्या समर्थकांची घालमेल वाढवत होते. अगदी ६९च्या मताधिक्यापासून सरुडकरांनी आघाडी घेतली; पण त्यांना शेवटच्या फेरीपर्यंत मोठी आघाडी घेता न आल्याने शेवटपर्यंत दोघांमध्ये झुंज पाहावयास मिळाली. अखेर माने यांनी बाजी मारली आणि जल्लोष सुरू झाला.

हातकणंगले मतदारसंघात उद्धवसेनेचे सत्यजीत पाटील-सरुडकर, शिंदेसेनेचे धैर्यशील माने व स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यातच सामना झाला. तिन्ही उमेदवार तगडे असल्याने येथे काटाजोड लढत होणार हे निश्चित होते; पण पहिल्या फेरीचा निकाल लागला आणि पाटील-सरुडकर यांनी धैर्यशील माने यांच्यावर अवघ्या ६९ ची आघाडी घेतली. शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यानंतरच्या चौथ्या फेरीपर्यंत सरुडकर यांनी ५४९९ चे मताधिक्य घेत आगेकूच सुरू केली; पण पाचव्या फेरीत १४४९चे मताधिक्य घेत माने यांनी आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. 

सहाव्या व सातव्या फेरीत सरुडकर यांनी अनुक्रमे ११०६ व ९० चे आघाडी घेतल्याने माने यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली. आठव्या व नवव्या फेरीत माने यांनी २११८ चे मताधिक्य घेत निवडणुकीत रंगत आणली. दहाव्या, अकराव्या व बाराव्या फेरीत सरुडकरांनी आघाडी घेतली. मात्र, चौदाव्या फेरीत माने यांनी मुसंडी मारली. त्यानंतरच्या फेरीत सरुडकर व माने यांच्यामध्ये कमालीची चुरस राहिली.

सोळाव्या फेरीपासून माने यांनी निर्णायक विजयाकडे आगेकूच ठेवली होती. फेरीनिहाय मताधिक्याचा लंबक इकडून तिकडे राहिल्याने माने व सरुडकर समर्थकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. जल्लोष करण्याच्या मानसिकतेत कोणीच दिसत नव्हते. शेवटच्या तीन-चार फेऱ्या राहिल्यानंतरच माने समर्थकांनी जल्लोष सुरू केला.

ठाण्याची यंत्रणा कामी आली..

हातकणंगलेत धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील यंत्रणा लावली होती. या यंत्रणेने लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्याची चर्चा मतदारसंघात होती.

हातकणंगले लोकसभा विधानसभानिहाय आघाडी..

लोकसभा निवडणूक : २०१९  विधानसभानिहाय आघाडी

धैर्यशील माने - आघाडी

हातकणंगले : ४५,४६७.
शाहूवाडी : २१,७४३
इचलकरंजी : ७४,९३०

राजू शेट्टी - आघाडी
शिरोळ : ७,०४८
इस्लामपूर : १८,५५०
शिराळा : २१,०४२.


लोकसभा निवडणूक : २०२४ विधानसभानिहाय आघाडी

धैर्यशील माने - आघाडी
हातकणंगले : १७,४९३
इचलकरंजी : ३९,१७२
शिरोळ : ३,२४७

सत्यजीत पाटील - आघाडी
शाहूवाडी : १८,९९७
इस्लामपूर : १७,४८१
शिराळा : ९,२८१

Web Title: Hatkanangale Lok Sabha Constituency results are tight till the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.