Hatkanangale Lok Sabha : 'दोन्ही आघाड्यातील कारखानदार एकत्र येऊन माझ्याविरोधात...', राजू शेट्टींनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 05:31 PM2024-04-04T17:31:17+5:302024-04-04T17:37:12+5:30
Hatkanangale Lok Sabha : दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटलो. सुरुवातीला अनुकूलता दाखवली, मात्र कुठून काय चाव्या फिरल्या माहित नाही, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. '
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता बुधवारी संपुष्टात आली. ठाकरे गटाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली. आता शिंदेसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, मविआचे सत्यजित पाटील स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि वंचितचे डी. सी. पाटील अशी लढत तेथे होणार आहे, या मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठींबा देणार असल्याची चर्चा होती. पण, आता ठाकरेंनी उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक जोरदार होणार आहे.
धाराशिवमध्ये महायुतीकडून 'अर्चना पाटील'; पती भाजपा आमदार, पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार
आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीसोबत सुरू असलेल्या चर्चेबाबत माहिती दिली. "निवडणुकीत लढत किती रंगी असावी हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. निवडणूक लढवणं हे माझं काम आहे, निवडणूक कितीही रंगी होऊद्या मा तयारी केरत आहे. मत विभागणीची चिंता जे उमेदवार करत त्यांनी करावी मी काळजी करत नाही, असंही राजू शेट्टी म्हणाले.
"पहिल्यापासून महाविकास आघाडीसोबत जायचं नाही हा निर्णय पक्का होता, महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यात उसाची एफआरपी तीन टप्प्यात करण्यात आली. जो निर्णय शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवणारा होता, यासाठी आम्हाला संघर्ष करुन एक रक्कमी एफआरपी करुन घ्यावी लागली, आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचे कायदे होत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत का राहावं म्हणून आम्ही बाहेर पडलो. यामुळे आम्ही महाविकास आघाडी सोबत निवडणुकीत येणार नाही असे आम्ही म्हणालो होतो, असंही शेट्टी म्हणाले.
"दोन्ही आघाड्यामधील कारखानदार एकत्र येऊन हे कारस्थान"
"गेल्या तीन निवडणुका मी या मतदारसंघातून लढलो आहे. यामुळे मत विभागणीची काळजी आम्हाला करायची गरज नाही, मात्र यामध्ये मतांची भर पडली तर निवडणूक सुखकर होईल. यामुळे आम्ही महाविकास आघाडी सोबत चर्चा केली. यासाठी दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटलो. सुरुवातीला अनुकूलता दाखवली, मात्र कुठून काय चाव्या फिरल्या माहित नाही, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. 'दोन्ही आघाड्यामधील कारखानदार एकत्र येऊन हे कारस्थान करत आहेत, मात्र पुन्हा एकदा त्यांना आम्ही मैदानात लोळवू. त्यांचं आणि आमचा उद्देश सेम होता, यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली मात्र त्यांनी दुसरा उमेदवार दिला याबद्दल माझी काहीही तक्रार नाही, असंही शेट्टी म्हणाले.