hatkanangale lok sabha result 2024: हातकणंगलेत सत्यजीत पाटील यांची आघाडी कायम
By उद्धव गोडसे | Published: June 4, 2024 11:15 AM2024-06-04T11:15:38+5:302024-06-04T11:17:55+5:30
hatkanangale lok sabha result 2024: पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने पिछाडीवर
कोल्हापूर : hatkanangale lok sabha result 2024 हातकणंगले मतदार संघात इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील (satyajit patil) यांनी चौथ्या फेरीअखेर ५७६२ मतांची आघाडी मिळवली. पहिल्या फेरीपासून आघाडी घेत पाटील यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने (dhairyasheel mane) यांना पिछाडीवर ढकलले. राजू शेट्टी (raju shetti) यांचा काहीच करिश्मा निकालात दिसत नाही.
चौथ्या फेरीअखेर सत्यजीत पाटील यांना ७२ हजार ८२७ मते मिळाली. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना ६७ हजार ३१५ मते मिळाली. चौथ्या फेरीअखेर सत्यजीत पाटील यांनी ५७६२ मतांची आघाडी घेतली. येणा-या आठ ते दहा फे-यांमध्ये पाटील यांनी आघाडी टिकवल्यास त्यांना विजयाची संधी असेल. मात्र, फेरीगणिक मताधिक्य कमीजास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील आणि माने यांच्यातील चुरस अखेरच्या फे-यांपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला जात आहे.
निवडणुकीचे बिगूल वाजताच हातकणंगले मतदार संघातून विजयी होण्याचा दावा करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना मात्र पहिल्या चार फे-यांमध्ये कमालीचा धक्का बसला आहे. त्यांची मते प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या निम्म्याहून कमी आहेत. या मतदार संघात वंचित आघाडीचे उमेदवार डी. सी. पाटील यांनाही करिश्मा दाखवता आला नाही. २०१९ च्या निवडणुकीत या मतदार संघात वंचितच्या उमेदवाराने सुमारे सव्वा लाख मते घेऊन राजू शेट्टी यांचे विजयाचे गणित बिघडवले होते. यावेळी वंचितच्या उमेदवाराला पहिल्या चार फे-यांमध्ये केवळ साडेसहा हजार मते मिळवता आली आहेत. त्यामुळे निकालात वंचितचा फॅक्टर दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.