निवडणुकीची घोषणा होताच राजू शेट्टींनी दिला नवा नारा; मतदारांना आवाहन करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 07:15 PM2024-03-16T19:15:22+5:302024-03-16T19:15:45+5:30
माजी खासदार राजू शेट्टी हे स्वबळावर निवडणूक लढवणार असून आज निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी मतदारांना साद घातली आहे.
Raju Shetti ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. हातणंगले मतदारसंघातून माजी खासदार राजू शेट्टी हे स्वबळावर निवडणूक लढवणार असून आज निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी मतदारांना साद घातली आहे.
राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर हातकणंगले मतदारसंघाच्या मतदान तारखेचा उल्लेख करत म्हटलं आहे की, "७ मे... सर्व जण ७ द्या," असं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे. त्यांच्या आवाहनाला मतदारसंघातील नागरिक कशा प्रकारे प्रतिसाद देतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
— Raju Shetti (@rajushetti) March 16, 2024
हातकणंगले मतदारसंघात काय आहे स्थिती?
हातकणंगले मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ यापूर्वी भाजपकडे होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भाजपला प्रतिनिधित्व मिळत नाही. त्यामुळे उमेदवार शिंदे शिवसेनेचे ठेवून एक जागा कमळ चिन्हावर लढावी, असा आग्रह भाजपकडून सुरू आहे. हा मतदारसंघ यापूर्वी दोनवेळा भाजपने लढवला आहे. त्यावेळी राज्याच्या राजकारणात भाजप फारसा प्रभावी नसतानाही त्यांच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली आहेत. त्यामुळे खासदार माने यांनी कमळ चिन्हावर लढावे, असा पर्याय येऊ शकतो. स्वत: माने यांनाही त्यातच जास्त रस आहे; परंतु या वाटणीत शिंदे शिवसेनेची एक जागा कमी होते म्हणून ते कितपत तयार होतात यावरच चिन्ह बदलाचा निर्णय होईल.
या मतदारसंघात शेट्टी यांच्या संघटनेचा व भाजपचा एकही आमदार नाही. शिंदे शिवसेनेचा एक आमदार आहे. महाविकास आघाडी व महायुतीकडे प्रत्येकी तीन आमदार आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचे नाव चर्चेत आले होते. त्यांनी काही गावांत संपर्क मोहीमही राबविली होती; परंतु ती नंतर थांबवली. त्यामुळे महाविकास आघाडीचा स्वतंत्र उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता वाटत नाही. शेट्टी यांच्या उमेदवारीस मुख्यत: शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा जास्त आहे. कारण माने यांचा पराभव हे त्यांचे टार्गेट आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणुका
पहिला टप्पा - १९ एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.
दुसरा टप्पा २६ एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.
तिसरा टप्पा ७ मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
चौथा टप्पा १३ मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड.
पाचवा टप्पा २० मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, तसेच मुंबईतील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य या सहा मतदारसंघांचीही निवडणूक या दिवशीच होणार आहे. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर होणार आहे.