Hatkanangle Lok Sabha : ...तरच मतं मागायला आमच्या दारात या; धैर्यशील मानेंसाठी भाजपा समर्थकांचा स्पष्ट 'मेसेज'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:31 AM2024-03-29T11:31:11+5:302024-03-29T11:34:25+5:30
Hatkanangle Lok Sabha 2024 : कोल्हापूरातील भाजपा समर्थकांनी धैर्यशील मानेंच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत व्हॉट्स अॅप मेसेज, स्टेट्स व्हायरल झाले आहेत.
Hatkanangle Lok Sabha 2024 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्या आहेत. महायुतीकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी तयारी सुरू केली आहे. तर महाविकास आघाडीने अजूनही उमेदवार जाहीर केला नाही. काही दिवसापूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली होती. धैर्यशील माने यांची उमेदवारी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. यानंतर आता कोल्हापूरातील भाजपा समर्थकांनी माने यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
कोल्हापूरातील भाजपा समर्थकांनी धैर्यशील मानेंच्याविरोधात उघडं नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत व्हॉट्स अॅप मेसेज, स्टेट्स व्हायरल झाले आहेत. "आदरणीय मा.खा. धैर्यशील माने...काही दिवसापूर्वी तुम्ही एक स्टेटमेंट दिलेलं. 'जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटलांना दुखवून चालत नाही', हे आजही आम्ही कोणीही विसरलेलो नाही..आज भाजपाची मदत घेऊन उद्या काँग्रेसच्या नेत्यांचं गणगान गाणार असाल..तर हे इथून पुढे चालणार नाही...असं असेल तरच मतं मागायला आमच्या दारात या...', असं या मेसेजमध्ये भाजपा समर्थकांना म्हटले आहे. यामुळे आता कोल्हापूरात महायुतीतील अंतर्गत वाद असल्याचे समोर आले आहे.
महायुतीमधील कोल्हापुरातील भाजपाचे कार्यकर्ते धैर्यशील माने यांच्यावर नाराज होते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी मानेंच्या उमेदवारीला उघड विरोध केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल माने यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या काही दिवसापूर्वी एक कार्यक्रमात काँग्रेसचे सतेज पाटील आणि खासदार धैर्यशील माने एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी सतेज पाटील यांचे कौतुक केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.