हातकणंगले तालुक्यात अवैध धंदे जोमात

By admin | Published: October 5, 2015 11:46 PM2015-10-05T23:46:59+5:302015-10-06T00:31:39+5:30

पोलिसांचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न : दारूसाठी उत्पादन शुल्क खात्याकडे, तर गुटख्याकरिता अन्न व औषध प्रशासनाकडे बोट

In the Hatkanangle taluka, illegal business | हातकणंगले तालुक्यात अवैध धंदे जोमात

हातकणंगले तालुक्यात अवैध धंदे जोमात

Next

दत्ता बिडकर --हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १९ गावांमध्ये बेकायदेशीर देशी-विदेशींसह गावठी हातभट्टीची दारू, गुटखा आणि मटका जोरात सुरू असून, पोलीस दारूसाठी उत्पादन शुल्क खात्याकडे, तर गुटख्याकरिता अन्न व औषध प्रशासनाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याने गावागावांमध्ये तणाव निर्माण होत आहे.
हातकणंगले परिसरातील अनेक गावांनी २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे आणि २ आॅक्टोबरच्या ग्रामसभांमध्ये गावांमध्ये दारूबंदी तसेच बेकायदेशीर गुटखाबंदीबाबत ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेतले आहेत. मंजूर ठरावाच्या प्रती जिल्हा प्रशासन आणि संबंधित पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, कोणत्याही विभागाकडून या बेकायदेशीर व्यवसायविरुद्ध कारवाई केली जात नाही.
पोलीस ठाण्याकडे ग्रामस्थांनी दाद मागितली तर पोलीस कर्मचारी उत्पादन शुल्क विभागाकडे आणि अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाकडे बोट दाखवून नामानिराळे होत आहेत. यामुळे हतबल झालेल्या ग्रामस्थांनी थेट तालुक्याच्या तहसीलदारांना निनावी फोन करून अशा बेकायदेशीर व्यावसायिकांविरुद्ध मोहीम उघडली आहे. तालुका तहसीलदारांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले असता पोलिसांनी जुजबी कारवाई करून अशा बेकायदेशीर व्यावसायिकांना पाठीशी घालण्यास सुरुवात केली आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणगाववाडी आणि मौजे मुडशिंगी येथील हातभट्टी दारूचा दबदबा कोल्हापूर, सांगलीसह उत्तर कर्नाटक सीमाभागात पसरला आहे. दररोज पहाटेपासून पोलिसांच्या समक्ष गावठी दारूची बिनदिक्कत वाहतूक सुरू असते. अशावेळी त्यांच्यावर वेळीच कारवाई झाली, तर कोणत्याही ग्रामस्थाला वरिष्ठांकडे दाद मागावी लागणार नाही. राज्यात, जिल्ह्यामध्ये कधीकधी दारूकांडाचे बळी पडतात, तेव्हा पोलिसांना जाग येते आणि अशावेळी हातभट्टीधारकांवर छापे टाकून कारवाईचा फार्स केला जातो आणि पुन्हा चार-आठ दिवसांत मागे तसे पुढे सुरू होते. यावरून पोलिसांचा वचक अशा बेकायदेशीर व्यावसायिकांविरुद्ध राहिला नाही, हे स्पष्ट होते.


बेकायदेशीर व्यवसायाला आळा घालण्याची मागणी
गावागावांतील पान टपरींवर आणि किराणा मालाच्या दुकानांत बेकायदेशीर गुटखा विक्री सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल होताच त्यांना कुरणच मिळते.

४त्यांचे निरीक्षक येतात, मुद्देमाल जप्त करतात व विक्रे त्यांवर जुजबी कारवाई करून स्वत: मालामाल होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचण्याअगोदरच तडजोड होऊन रिकाम्या हाताने माघारी फिरतात.

४यामुळे तक्रारदार तोंडघशी पडतात. त्यामुळे हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर व्यवसायाला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, असे मत ज्येष्ठ नागरिक व्यक्तकरीत आहेत.


४पोलीस प्रशासन कधी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे, तर कधी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे बोट दाखवून नामानिराळे होत आहे.

Web Title: In the Hatkanangle taluka, illegal business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.