कोल्हापूर: हातकणंगले तालुका विभाजनाचा वाद; आवाडे, जानवेकरांमध्ये खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:22 PM2022-09-27T12:22:18+5:302022-09-27T12:24:01+5:30
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर जोरदार खडाजंगी
हातकणंगले : हातकणंगले तालुका विभाजनाच्या प्रश्नावरून इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे आणि हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांच्या मध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर जोरदार खडाजंगी झाली. इचलकरंजी तालुका व्हावा, अशी आमची मागणी आहे. राजू बाबा तुमचा तालुका वडगावला घेऊन चालले आहेत. ते थांबवा अशा शब्दात प्रकाश आवाडे यांनी नगराध्यक्ष जानवेकर यांना सुनावल्याने वादावादीला सुरुवात झाली.
जानवेकर यांनी तुम्हाला वेगळा तालुका पाहिजे तर तुम्ही इचलकरंजी शहरापुरता तालुका करून घ्या, असे सुनावले. खासदार धैर्यशील माने यांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला. महसूलमंत्री विखे पाटील यांनी याबाबत मंत्रालय स्तरावर चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन दिले.
हातकणंगले तालुका अडीच ब्लॉकचा असून, त्याचे विभाजन करू नये, असे निवेदन नगराध्यक्ष अरुणकुमार जानेवकर, सर्व नगरसेवक आणि ग्रामस्थाच्या वतीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले.
इचलकरंजी शहर आणि त्याला संलग्न महसुली सर्कलसाठी आमची स्वतंत्र तालुक्याची मागणी आहे. यासाठी स्वतंत्र अपर तहसील कार्यालय सुरू झाले आहे. शहराची लोकसंख्या विचारात घेऊन तालुका होणे गरजेचे आहे, असे मत आवाडे यांनी मांडले. तसेच हातकणंगलेचे मुख्यालय राजूबाबा आवळे हे पेठवडगावला नेत आहेत ते थांबवा. आमच्या आडवे कशाला येता असे म्हणताच जोरदार खडाजंगी झाली.