हातकणंगले तालुका क्रीडा संकुल १७ वर्षे रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:21+5:302021-08-12T04:28:21+5:30
हातकणंगले : एक कोटीच्या तालुका क्रीडा संकुलाचा ...
हातकणंगले : एक कोटीच्या तालुका क्रीडा संकुलाचा विषय गेली १७ वर्षे रखडला आहे. पहिला हातकणंगले, नंतर मिणचे आणि आता पेठवडगाव, अशी क्रीडा संकुलाच्या जागेची अदलाबदल सुरू असल्याने हा प्रकल्प धूळखात पडून आहे. क्रीडा संकुलासाठी क्रीडाप्रेमींनी आवाज उठवण्याची गरज आहे.
तालुक्यासाठी २००४ मध्ये तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री जयवंतराव आवळे यांनी तालुका क्रीडा संकुल मंजूर करून आणले. क्रीडा संकुलासाठी हातकणंगले ग्रामपंचायतीने त्यावेळी लक्ष्मी औद्योगिक वसाहतीशेजारील गायरानमधील ८ एकरचा भूखंड क्रीडा संकुलासाठी दिला. शासनाने क्रीडा संकुलासाठी २५ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला. निधीची रक्कम स्टेट बँकेच्या खात्यावर जमा झाली. त्यानंतर २००५ च्या विधानसभा निवडणुकीत तालुक्याची राजकीय समीकरणे बदलली आणि जनसुराज्यचे राजीव आवळे आमदार झाले. त्यांनी क्रीडा संकुलाची जागा गैरसोयीची असल्याने क्रीडा संकुलासाठी कोल्हापूर- सांगली राज्य मार्गाशेजारील रामलिंग फाट्यानजीकची गायरान जागा सोयीची असल्याचे कारण देऊन जागा बदल प्रस्ताव शासनाकडे पाठवला. हा जागा बदल प्रस्ताव राजकीय कुरघोडीमध्ये अडकला.
क्रीडा संकुलाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना २००९ मध्ये पुन्हा तालुक्यामध्ये राजकीय संदर्भ बदलले आणि शिवसेनेचे सुजित मिणचेकर आमदार झाले. त्यांच्याकडून क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला. हातकणंगले गावातील जागेचा वाद मिटत नसल्याने त्यांनी मिणचे ग्रामपंचायतीकडे क्रीडा संकुलाच्या ८ एकर जागेसाठी पाठपुरावा केला.
मिणचे गायरानमधील जागा क्रीडा संकुलासाठी मंजूर झाली. आता क्रीडा संकुलचा प्रश्न मार्गी लागणार असे वाटत असतानाच २०१९ मध्ये पुन्हा तालुक्याची राजकीय समीकरणे बदलली. काँग्रेसचे राजू बाबा आवळे आमदार झाले. त्यांच्याकडून क्रीडा संकुलाचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. क्रीडा संकुलासाठी पेठवडगाव नगर परिषदेकडून ८ एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी क्रीडाप्रेमींना आशा आहे.
कोट.....
तालुक्याच्या ठिकाणीच क्रीडा संकुल व्हावे. तहसील, पंचायत समितीसह सर्व शासकीय कार्यालये हातकणंगले येथे आहेत. दळणवळणाच्या सोयीने मध्यवर्ती ठिकाण आहे. १ कोटी निधी महाराष्ट्र शासनाकडून क्रीडा संकुलासाठी दिला जातो. केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आहे. क्रीडा संकुलासाठी केंद्र शासनाकडून आणखी ५ कोटींचा निधी मंजूर करून आणू. मात्र, क्रीडा संकुल तालुक्याच्या ठिकाणीच होणे गरजेचे आहे.
अरुण इंगवले, ज्येष्ठ जि.प. सदस्य