सलाम तिच्या कर्तृत्वाला...
By Admin | Published: March 7, 2017 10:33 PM2017-03-07T22:33:50+5:302017-03-07T22:33:50+5:30
तिचा परिसस्पर्श लाभला नाही, असं एकही क्षेत्र सुटलेलं नाही. म्हणूनच तिच्या कर्तृत्वाला सलाम करावसा वाटतो.
महिला दिन आला की समाजात ‘ती’च्या कार्याची महती कळते. त्या दिवशी तिला गुलाबाची फुलं दिली जातात. कर्तृत्वाचे पोवाडे गायले जातात. पण एका दिवसानं ती कधीच हुरुळून जात नाही. भल्या पहाटे उठून स्वत:बरोबरच पती, मुलं, सासू-सासरे यांची कामं ती न थकता करते. त्यांचा चहा, नाष्टा, जेवण करून ती कामाला जाते. तिनं कधीच हार मानली नाही. कोणत्याही कामाला कमी लेखलं नाही. त्यामुळंच ती शेतातील मजुरीच्या कामाबरोबरच रेल्वेही चालवत आहे. तिचा परिसस्पर्श लाभला नाही, असं एकही क्षेत्र सुटलेलं नाही. म्हणूनच तिच्या कर्तृत्वाला सलाम करावसा वाटतो.
आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला सक्रिय असलेल्या पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी ‘बॉस’च्या खुर्चीवर बसलेल्या महिलेला पाहिलं की साहजिकच सामान्यांना तिचा अभिमान वाटायला लागतो. पण तिला स्त्री आणि पुरुष ही एकाच रथाची दोन चाकं आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीत स्वत:चं स्थान मिळविण्यासाठी, स्वत:चा ठसा उमठविण्यासाठी तिला अनेक वर्षांपासून लढा द्यावा लागला. तेव्हा कोठे ती यशस्वी झालेली पाहायला मिळत आहे.
स्त्रीयांना हिंदू धर्मामध्येही आदराचे स्थान मिळाले आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. यातून स्त्रीच्या शक्तीला दिलेले स्थान अधोरेखित होते.
स्त्री आणि पुरुष यांच्यात केवळ शरीरभेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील, श्रद्धावंत आहे, तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरुषाचे लक्ष्य मात्र भौतिकतेकडे, जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते.
तसं पाहता समाजातील स्वत:चे न्यायस्थान जगभरात कुठेही भारतातील महिलांना पुरुषांप्रमाणे उक्ते मिळाले नाही. गेल्या शतकात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेला प्रगतीचा थोडक्यात प्रवास १९५० मध्ये प्रेम माथूर यांना भारतातील पहिल्या व्यावसायिक महिला वैमानिक होण्याचा मान, १९५२ च्या आॅलिम्पिक स्पर्धामध्ये पुरुष व महिलांना एकत्र खेळण्याची संधी, भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, सुचेता कृपलानी यांना भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान, भारतीय पोलिस सेवेत अधिकारी पदावर किरण बेदी यांची निवड पोलिस सेवेत अधिकारी पदावर दाखल झालेल्या पहिल्या महिला, मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर, भारतीय सैन्य दलात महिलांचा प्रवेश, भारताच्या राष्ट्रपती पदी प्रतिभाताई पाटील, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतरत्न किताब ही यादी संपतच नाही.
भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले आहे. स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपरिकरीत्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीरा बोरवणकर, सुनीता विल्यम्स, अंजू जॉर्ज, कल्पना चावला, सानिया मिर्झा या महिला आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत.
पोलिस, लष्करी दल याबरोबर, रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणे, एसटी कंडक्टर, पत्रकारिता, फायरब्रिगेड ही क्षेत्रे सुद्धा महिलांनी काबीज केली आहेत. सध्या भारतात मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या महिला आहेत. आताच राष्ट्रकूल स्पर्धांमध्ये भारतीय महिलांची कामगिरी उल्लेखनीय आहे. सध्या राष्ट्रीय राजकारणात महिलांची संख्या नगण्य आहे. आर्थिक क्षेत्रातही अनेक महिला मोठ्या पदांवर कार्यरत आहे. संशोधन क्षेत्रातही महिलांची संख्या वाढतेय ही चांगली गोष्ट आहे.
त्याचप्रमाणे समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात पडते असं म्हणतात. चित्रपट हे माध्यम जनसामान्यांवर प्रभाव टाकतं. काळाबरोबर चित्रपटातील नायिका बदलत गेली. विशेष म्हणजे चित्रपटातील हे बदल समाजामध्ये स्त्रीनं घडवून आणलेल्या बदलांचं प्रतिबिंब आहे. स्वातंत्र्यापूर्वी ‘फिअरलेस’ १९१३-४७ एक स्त्री अन्यायाचा प्रतिकार करीत, गुडांना लोळवत या काळात रूपेरी पडदा गाजवत होती.