हॅट्ट्रिकवर विश्वास...अविश्वास! : हातकणंगलेच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:46 PM2019-05-21T23:46:36+5:302019-05-21T23:47:54+5:30
लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, प्रत्येक कार्यकर्ता
गणपती कोळी ।
कुरुंदवाड : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, प्रत्येक कार्यकर्ता आपलाच उमेदवार कसा निवडून येतो, याची आकडेमोड पटवून देत आहेत.
खासदार शेट्टीसमर्थक खासदार हॅट्ट्रिक करणार यावर ठाम आहेत तर विरोधक या मतदारसंघात स्व. बाळासाहेब माने यांच्यानंतर कोणत्याही खासदाराची हॅट्ट्रिक झालेली नाही. त्यामुळे शेट्टी पराभूत होऊ शकतात, यावर विश्वास आहे. त्यातूनच कार्यकर्त्यांतून पैजा लागल्या असून, शेट्टी हॅट्ट्रिक करतात की, विरोधकांचा विश्वास खरा ठरतो, याचा फैसला निकालानंतरच लागणार आहे. मात्र, इर्ष्येच्या राजकारणाच्या चर्चेने रंगत आली आहे.
शेट्टी हे चळवळीतील व शेतकऱ्यांच्या मनातील विश्वासू नेतृत्व असल्याने प्रारंभी ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माने यांच्या विजयाची घेतलेली जबाबदारी व केलेली खेळी, मतदारसंघात शिवसेना-भाजप आमदारांचे असलेले संख्याबळ, ‘एक मराठा-लाख मराठा’ची हाक, वंचित आघाडीच्या मत विभागणीचा फटका यामुळे शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे कार्यकर्तेच नव्हे, तर उमेदवारही स्वत:च्या विजयाबाबत साशंक आहेत.
कट्टर कार्यकर्ते मात्र आपलाच उमेदवार निवडून देण्यावर ठाम असून, जेवणापासून ते रोख रकमेपर्यंत पैजा खेळल्या जात आहेत. माने समर्थक या मतदारसंघात बाळासाहेब माने यांचा अपवादवगळता अन्य कोणत्याही खासदारांनी हॅट्ट्रिक केलेली नाही. त्यामुळे शेट्टींचा पराभव निश्चित आहे, असा दावा करत आहेत शिवाय मतदारसंघात शिवसेना-भाजप आमदारांची संख्या मोठी असल्याने त्यांचे वर्चस्व आहे. तरुण मतदारांवर मोदी लाटेचा प्रभाव, एकवटलेला मराठा समाज, वंचित आघाडीची विभागलेली मते यामुळे धैर्यशील मानेच निवडून येणार यावर कार्यकर्ते ठाम आहेत.
तर खासदारसमर्थक वंचित आघाडीकडे जाणारी मते खा. शेट्टी यांना फारशी कधीच मिळालेली नाहीत, उलट काँग्रेस समर्थनामुळे मुस्लिम गठ्ठा मतांचा फायदा, शेतकरी चळवळ म्हणून शेतकºयांची मते, सूज्ञ मतदारांतून मोदीविषयी असलेली संतापाची लाट, मतदारसंघात शिवसेना-भाजपचे आमदार असले, तरी लोकसभेत मतदार न ऐकण्याची भूमिका यामुळे निवडून येण्यास अडचण नाही. गतवेळचे फार तर लीड कमी होईल, मात्र, खा. शेट्टीच निवडून येणार, यावरच त्यांचा विश्वास आहे. एकूणच दावे-प्रतिदावे अन् आकडेमोडीवरून कार्यकर्त्यांतून रंगलेली चर्चा मतदार व कार्यकर्त्यांत निकालाच्या उत्सुकतेत भर पडत आहे.
शेट्टींनी बनविले नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य
हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शेतकºयांचा ऊस व दूध दरावरून रणांगण गाजविलेले
खा. राजू शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर ‘स्वाभिमानी’कडून निवडणुकीत उतरले आहेत. शेट्टी यांनी भाजपला विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टीकेचे लक्ष्य केल्याने भाजप-शिवसेना युतीने शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देऊन राजकीय खेळी खेळली आहे.