हवालदिल पोल्ट्रीधारकांना व्याज सवलतीच्या बूस्टरची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:19+5:302021-05-18T04:24:19+5:30

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाने पोल्ट्रीधारकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात साडेचार हजार पोल्ट्रीधारक शेतकरी आहेत. ...

Havaldil Poultry Holders Need Interest Concession Booster | हवालदिल पोल्ट्रीधारकांना व्याज सवलतीच्या बूस्टरची गरज

हवालदिल पोल्ट्रीधारकांना व्याज सवलतीच्या बूस्टरची गरज

googlenewsNext

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाने पोल्ट्रीधारकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात साडेचार हजार पोल्ट्रीधारक शेतकरी आहेत. त्यापैकी शंभरहून अधिक जिल्हा बँकेचे कर्जदार असून, कर्जाचे हप्ते भरायचे कसे, या विवंचनेत शेतकरी असून, बँकेने किमान व्याजमाफी करावी, अशी मागणी होत आहे.

कोरोनानंतर ‘बर्ड फ्लू’चे संकट आणि आता पुन्हा लॉकडाऊन यामुळे पोल्ट्री व्यवसाय पुरता उद्‌ध्वस्त झाला आहे. जिल्ह्यात साडेचार हजार पोल्ट्रीधारक आहेत. या व्यवसायातील अनिश्चितपणामुळे त्यातील हजारहून अधिक पोल्ट्री बंद पडल्या आहेत. ज्या सुरू आहेत, त्याही अडचणीत आहेत. दुसरा पर्याय नसल्याने पक्ष्यांचे संगोपन करावे लागत आहे. विविध बँकांकडून कर्जे काढली आहेत. त्याचा हप्ता भरता आलेला नाही. जूनच्या हप्त्यासाठी तगादा लागला आहे. पक्ष्यांच्या संख्येनुसार दहा लाखांपासून तीस लाखांपर्यंत बँकांकडून कर्जे घेतलेली आहेत. त्यातील शंभरहून अधिक पोल्ट्रीधारकांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले आहे. या व्यवसायातून चार पैसे मिळू लागल्याने हजारो शेतकरी याकडे वळले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक आरिष्टात पोल्ट्री व्यवसाय अडकला आहे. ‘बर्ड फ्लू’च्या अफवेने तर गल्लाेगल्ली फिरून कोंबड्या विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. अक्षरश: फुकापासरी किमतीने काेंबड्या विकल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

बँकेचे अधिकारी वसुलीसाठी दारात येऊ नयेत, यासाठी उसनवार करणे, जादा व्याजाने इतर वित्तीय संस्थांकडून पैसे उचलण्यापलीकडे शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने केवळ व्याज माफ केले, तर तेवढा हातभार शेतकऱ्यांना लागू शकतो. किमान ज्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही, अशांना व्याजात सवलत दिली तरी शेतकरी तग धरू शकणार आहेत.

शेतकऱ्यांना सवलती देणारी जिल्हा बँक

जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक उपयुक्त योजना राबविल्या आहेत. पाच लाखांपर्यंत पीक कर्ज बिनव्याजी कर्ज देणारी राज्यातील पहिली बँक आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या पोल्ट्रीधारकांना व्याज सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोट-

जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू करून त्यातून संसाराचा गाडा चालवीत बँकेचे हप्ते भरले. व्यवसाय अडचणीत आल्याने कर्ज फेडता येईना, जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ हे शेतकरी व गरिबांचे कैवारी आहेत, त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या, ते आम्हालाही या संकटातून वाचवतील.

- भारती पाटील (पोल्ट्रीधारक, शेतकरी)

लॉकडाऊनमुळे पोल्ट्रीधारकांप्रमाणेच इतर कर्जदारही अडचणीत आले आहेत. त्यांनी कर्जाची किती उचल केली, व्याज सवलतीचा किती बोजा पडेल, याची माहिती घ्यावी लागेल.

- हसन मुश्रीफ (ग्रामविकास मंत्री, अध्यक्ष जिल्हा बँक)

Web Title: Havaldil Poultry Holders Need Interest Concession Booster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.