हळदीतील शिवस्मारकाचे काम दोन वर्षे रखडले : निधीची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:48 AM2017-11-30T00:48:21+5:302017-11-30T00:52:34+5:30

सडोली (खालसा) : कोल्हापूर-राधानगरी रोडवरील हळदी (ता. करवीर) येथे शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले आहे

 Havdiv Shivsammar's work retired for two years: lack of funds | हळदीतील शिवस्मारकाचे काम दोन वर्षे रखडले : निधीची कमतरता

हळदीतील शिवस्मारकाचे काम दोन वर्षे रखडले : निधीची कमतरता

Next
ठळक मुद्देकासवगतीने काम सुरू; पंचवीस लाखांचा प्रस्तावित खर्च, मदतीचे आवाहनस्वत:हून सर्व अतिक्रमणे काढून घेतली आणि स्मारकाच्या जागेचा मार्ग मोकळा झाला.

दीपक मेटील ।
सडोली (खालसा) : कोल्हापूर-राधानगरी रोडवरील हळदी (ता. करवीर) येथे शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले आहे. लोकसहभागातून स्मारकाचे कामही सुरू झाले, मात्र निधीअभावी हे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे.

हळदीतील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवविचाराने प्रेरित होऊन गावात शिवस्मारक उभारण्याचा निर्धार केला. कोल्हापूर- राधानगरी रोडवरील शिवाजी चौकातील जागेवर शिवस्मारक उभारण्यापाठीमागचा आपला प्रामाणिक हेतू व उद्देश लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न मंडळाने सुरू केला. त्याचाच भाग म्हणून त्यांनी जागेसाठी जगद्गुरू शंकराचार्य यांची भेट घेऊन स्मारकासाठी मठाच्या मालकीच्या जागेची मागणी केली. शंकराचार्य यांनीही स्मारकासाठी मठाच्या मालकीची पाच गुंठे जमीन शिवाजी चौक तरुण मंडळाच्या नावावर करून दिली. त्यानंतर जागेवर अतिक्रमणे केलेल्या फेरीवाले व दुकानदारांना मंडळाने आवाहन केले, तेव्हा त्यांनी स्वत:हून सर्व अतिक्रमणे काढून घेतली आणि स्मारकाच्या जागेचा मार्ग मोकळा झाला.

छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचा पदस्पर्श हळदी गावाला झाल्यामुळे मोठी ऐतिहासिक परंपरा गावाला लाभली असल्याची नोंद असल्याने या गावाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाजी चौक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लोकसहभागातून स्मारकाच्या कामास सुरुवात केली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक सहकारी संस्था, व्यक्ती यांनी यासाठी आर्थिक सहकार्य देऊ केले. त्यातून कामास प्रारंभही झाला.
दहा फूट उंचीचा दगडी चबुतरा बांधण्यात आला आहे. अन्य लहान - मोठी कामे करण्यात आली आहेत. शिवरायांच्या पूर्णाकृती सव्वासात फूट उंचीच्या पुतळ्यासाठी सव्वा लाख रुपयांची अ‍ॅडव्हान्स देण्यात आली आहे. स्मारकाच्या सभोवती कंपाऊंड वॉल, हायमॅक्स लॅम्प, बोअर, पेव्हिंग ब्लॉक, आकर्षक गार्डन, आदी कामे करण्यात येणार आहेत. आतापर्यंत मंडळाकडून सुमारे साडेपाच लाख रुपये खर्च झाले आहेत. या स्मारकाच्या नियोजित आराखड्याप्रमाणे अंदाजित खर्च हा २५ लाख रुपयांपर्यंतचा आहे.

स्मारकाच्या बांधकामाकरिता लागणारा खर्च पाहता मंडळाकडे जमा झालेली रक्कम व झालेला खर्च पाहता फार मोठी आर्थिक समस्याउभी राहिली आहे. स्मारकाच्या पूर्णत्वासाठी लागणाºया आर्थिक निधीची कमतरता भासू लागल्यामुळे स्मारकाचे काम कासव गतीने चालले आहे. त्यामुळे हळदी गावातील शिवस्मारक लवकर पूर्ण होण्यासाठी सहकार, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आदी क्षेत्रांतील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदतीचा हात पुढे करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 

हळदी गावाला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ऐतिहासिक वारसा प्राप्त झाला आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी गावातील सर्व तरुणाई एकत्र आली व आपल्या ऐपतीप्रमाणे मदत केली, परंतु हे काम मोठे असल्याने सर्व स्तरातून मदत मिळाली तर हे काम पूर्णत्वास जाईल. यासाठी मदतीची गरज असून दानशूर व्यक्तींनी मदत करावी.
- संजय जाधव,
अध्यक्ष, शिवाजी तरुण मंडळ

Web Title:  Havdiv Shivsammar's work retired for two years: lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.