विश्वासात घेऊन नियोजन करावे
By Admin | Published: September 12, 2015 12:28 AM2015-09-12T00:28:36+5:302015-09-12T00:52:16+5:30
मागणी : क्षेत्र निश्चितप्रश्नी पालकमंत्र्यांना भेटणार : आंदोलन विश्वासात घेऊन नियोजन करावे फेरीवाल्यांची मागणी : उद्या क्षेत्र निश्चितप्रश्नी पालकमंत्र्यांना भेटणार : जबरदस्ती केल्यास आंदोलन
कोल्हापूर : शहरातील फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करताना महानगरपालिका प्रशासनाने कोणाशी चर्चा करून निर्णय घेतला, असा सवाल करीत फेरीवाल्यांना विश्वासात न घेता जर काही अशा प्रकारची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर सर्व फेरीवाल्यांना पुन्हा एकदा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा कोल्हापूर शहर सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीतर्फे शुक्रवारी देण्यात आला.
महानगरपालिका प्रशासनातर्फे गुरुवारी (दि. १०) शहरातील फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यात आले; परंतु महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे धक्का बसला. फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असताना आणि त्या अनुषंगाने शहरातील विविध भागांत फिरती करून पाहणी करण्यात येत असताना, असा अचानक कसा काय निर्णय घेतला, अशी विचारणा खुद्द फेरीवाला कृती समितीचे नेते करू लागले. सायंकाळी अचानक त्यांची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर आर. के. पोवार होते.
महानगरपालिका प्रशासनाची ही भूमिका संशयास्पद असल्याने उद्या, रविवारी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृहावर पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटण्याचा, तसेच मंगळवारी (दि. १५) सकाळी महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना भेटण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महापालिका प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतला तर मात्र फेरीवाल्यांसमोर आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय असणार नाही, असा इशाराच बैठकीत देण्यात आला.
फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यासाठी चार विभागीय कार्यालयांमार्फत समित्या नेमण्यात आलेल्या असून, या समित्यांचे सदस्य शहरात फिरती करीत आहेत. पर्यायी व्यवस्था काय करायची, कोठे करायची याचा अभ्यास केला जात आहे. परंतु असे असताना एकदमच हे क्षेत्र जाहीर केले. कोणाच्या सांगण्यावरून प्रशासनाने हा निर्णय घेतला, त्याला कोणाची मंजुरी घेण्यात आली, असे प्रश्न दिलीप पवार यांनी बैठकीत उपस्थित के ले. विभागीय समितीच्या बैठकीत महापालिकेच्या नियोजनाला थेट विरोध करण्यात आला असताना असा एकतर्फी निर्णय घेण्याची काय गरज होती, असा सवालही पवार यांनी केला. महानगरपालिकेने केलेल्या नियोजनास निवडणुकीचा वास येतो का, अशी शंकाही यावेळी काहीजणांनी बैठकीत व्यक्त केली. रस्त्यावर व्यवसाय करण्याचा फेरीवाल्यांचा हक्कच असून त्यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने धोरण राबविण्याचे आदेश दिले आहेत.
व्यवसाय करायचा तरी कोठे?
शहरातील बहुतांश प्रमुख रस्त्यांवर ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. सध्या अनेक ठिकाणी महत्त्वाच्या रस्त्यांवर फे रीवाले महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेवर, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेत व्यवसाय करीत आहेत. तरीही ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करताना याच प्रमुख रस्त्यांचा त्यात समावेश केल्याने फेरीवाल्यांनी व्यवसाय करायचा तरी कोठे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.