लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांसह दिव्यांगांची वेगळी रांग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:22 AM2021-05-16T04:22:11+5:302021-05-16T04:22:11+5:30
कोल्हापूर : लसीकरण केंद्रावर साठ वर्षांवरील नागरिकांची व दिव्यांगांची वेगळी रांग करण्याच्या सूचना महापालिका प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांनी ...
कोल्हापूर : लसीकरण केंद्रावर साठ वर्षांवरील नागरिकांची व दिव्यांगांची वेगळी रांग करण्याच्या सूचना महापालिका प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांनी शनिवारी दिल्या. त्या शनिवारी महापालिका स्थायी सभागृहात झालेल्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होत्या.
डाॅ. बलकवडे म्हणाल्या, ज्या क्षेत्रात कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत, त्या क्षेत्रातील सर्व भागातील व्याधीग्रस्त नागरिकांची अँटिजन करावी. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना लसीकरण केंद्रात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याकरिता वेगवेगळी रांग करावी. जेणेकरून त्यांना लस घेणे सुलभ जाईल. यासह बाधित क्षेत्र, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग, खासगी व सरकारी रुग्णालयातील बेडची उपलब्धता याची दैनंदिन माहिती महापालिका पोर्टलवरही द्यावी, अशा सूचनाही त्यांनी उपशहर अभियंत्यांना दिल्या. शहरात कोरोना केअर सेंटर अथवा कोविड सेंटर सुरू करण्यापूर्वी त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. नियमांच्या अधिन राहून अशा सेंटरची तपासणी करून उपायुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांनी मगच परवानगी द्यावी. लाॅकडाऊन काळात शहरातील मुख्य रस्ते आरोग्य विभागामार्फत स्वच्छ करण्यासाठी नियोजित आराखडा तयार करावा. ज्या बालकांचे आई-वडील कोविडने मृत झाले आहेत, त्यांची माहिती उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे करावी, असे आवाहनही डाॅ. बलकवडे यांनी केले आहे.
यावेळी उपआयुक्त रविकांत अडसुळे, निखिल मोरे, सहायक आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, आरोग्य अधिकारी डाॅ. अशोक पोळ, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार आदी उपस्थित होते.