जखमेवर मीठ चोळायला आलाय काय? संतप्त मराठा आंदोलक : विधिमंडळ अंदाज समितीला विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:23 AM2018-08-24T01:23:00+5:302018-08-24T01:23:28+5:30
कोल्हापूर : जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी भेट घेत ‘आमच्या जखमेवर मीठ चोळायला आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायला आला आहात काय?’ अशी संतप्त विचारणा केली. यावर अध्यक्ष आमदार अनिल कदम यांनी आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवू, असे आश्वासन दिले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे गेल्या ३१ दिवसांपासून कोल्हापुरात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गत महिन्यात जिल्हा दौºयावर येणाºया विधिमंडळ अंदाज समितीला आंदोलकांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे या समितीने आपला दौरा रद्द केला होता. गुरुवारपासून ही समिती पुन्हा दौºयावर आल्याने संतप्त सकल मराठा समाजाच्या दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, स्वप्निल पार्टे, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर या आंदोलकांनी शासकीय विश्रामगृह गाठले. तेथे समितीचे अध्यक्ष आमदार अनिल कदम, सदस्य आमदार राजेश काशिवार व रमेश बुंदिले यांना ‘आमचे आंदोलन सुरू असताना तुम्ही जखमेवर मीठ चोळायला आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायला आला आहात काय?’ अशी विचारणा केली.
सरकारने १०० दिवसांत आम्हाला आरक्षण देतो, असे म्हटले होते; परंतु चार वर्षे झाली तरी निर्णय घेतला नाही. सरकार आरक्षण कसे देणार ते स्पष्ट करावे, असे एकापाठोपाठ प्रश्न विचारत आंदोलकांनी आमदार कदम, सदस्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर व आमदार प्रकाश आबिटकरांनी हस्तक्षेप करीत आम्ही नेहमीच मराठा आंदोलनामध्ये सहभागी आहोत; त्यामुळे समितीचे अध्यक्ष हे आंदोलकांच्या मागण्या मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवतील असा विश्वास दर्शविला. आमदार कदम यांनीही मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळात भूमिका स्पष्ट केल्याचे सांगितले. आंदोलकांनी लेखी मागण्या द्याव्यात, त्यावर सविस्तर पत्र तयार करून ते समिती सदस्यांच्या स्वाक्षरीने मुख्यमंत्री फडणवीस यांना देऊ अशी ग्वाही दिली.
ठिय्या आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा
दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अनिल कदम, सदस्य आमदार राजेश काशिवार, रमेश बुंदिले तसेच आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, याबाबतची व्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवून पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, वसंतराव मुळीक, गणी आजरेकर, जयेश कदम, किशोर घाटगे, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते.
..तर मोर्चात सहभागी व्हा
मराठा समाजाबद्दल आत्मीयता असेल तर मुंबईत ४ सप्टेंबरला निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन इंद्रजित सावंत यांनी आमदार अनिल कदम यांना केले. यावर ‘आम्ही कायम समाजासोबत असून या मोर्चातही सहभागी होऊ, अशी ग्वाही कदम यांनी दिली.
मराठा वसतिगृह गळके
सरकारने मराठा समाजासाठी नुसतेच आदेश काढले आहेत. कोल्हापुरात समाजासाठी बांधलेले वसतिगृहही पावसामुळे गळत असल्याचे सांगत इंद्रजित सावंत यांनी त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला.
रणदिवेवाडी, निगवे खालसा ग्रामस्थांचा सहभाग : रणदिवेवाडी (ता. कागल) येथील हसन मुश्रीफ समर्थकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. यामध्ये माजी सरपंच बाजीराव खोत, उपसरपंच सुधाकर खोत, प्रकाश मोरे, पांडुरंग खोत, आदी सहभागी होते. निगवे दुमाला (करवीर) येथील जयहिंद सेवा संस्थेने सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवला. यात अध्यक्ष सर्जेराव एकशिंगे, प्रकाश पाटील, बाळासाहेब कुर्ते, शिवाजी शेजाळ सहभागी होते.