फेरीवाला झोन मोहीम रोखली

By admin | Published: February 22, 2016 12:55 AM2016-02-22T00:55:36+5:302016-02-22T01:06:12+5:30

व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध : महाद्वार रोड, न्यू शाहूपुरीत वादावादी; आज पुन्हा कार्यवाही

Hawker zone campaign stopped | फेरीवाला झोन मोहीम रोखली

फेरीवाला झोन मोहीम रोखली

Next

कोल्हापूर : शहरातील फेरीवाला झोन धोरण राबविण्यास महापालिकेच्या विभागीय कार्यालयामार्फत रविवारी प्रारंभ करण्यात आला; पण महाद्वार रोड, वायल्डर मेमोरिअल चर्चचा परिसर, रेल्वे फाटक, आदी प्रमुख ठिकाणी फेरीवाला झोनचे पट्टे मारण्यास गेलेल्या पथकाला तेथील नागरिक व व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने महापालिकेच्या पथकाला ही मोहीम अर्धवट ठेवावी लागली. याबाबत आज, सोमवारी हे चारही विभागीय कार्यालयांतील अधिकारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चा करून पुन्हा कार्यवाही करण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाप्रमाणे विविध ठिकाणी ‘नो फेरीवाला झोन व फेरीवाला झोन’ निश्चित करण्यात आले होते; परंतु फेरीवाला कृती समितीच्या वतीने याला विरोध केला होता. त्यामुळे आयुक्त पी. शिवशंकर यांनी फेरीवाला कृती समितीची बुधवारी बैठक घेऊन पर्यायी जागा निश्चित केल्या. त्यानुसार आज, रविवारपासून या फेरीवाला झोनची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कृतीसाठी रस्त्यावर उतरली.
रविवारी सकाळी गांधी मैदान, शिवाजी मार्केट, राजारामपुरी, ताराराणी मार्केट या चारही विभागीय कार्यालयांमार्फत एकाचवेळी ही कारवाई करण्यास सुरुवात केली. प्रारंभी बैठकीत झालेल्या नियोजनानुसार ठरलेल्या ठिकाणी रस्त्याकडेला फेरीवाला झोन करण्यासाठी पाच बाय पाच फुटांचे चौरस पट्टे मारण्यास प्रारंभ झाला. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहरप्रमुख एस. के. पाटील हे पथकासह महाद्वार रोडवर दाखल झाले. येथे सारडा दुकानासमोरून पट्टे मारण्यास प्रारंभ करण्यापूर्वीच तेथील व्यापारी रस्त्यावर एकत्र आले. त्यांनी या पथकाला विरोध केला. त्यामुळे हे पथक माघारी फिरले. हेच पथक पुन्हा लक्ष्मी रोडवर आदर्श भिमा वस्त्रम ते द्वारकादास शामकुमार कापड दुकानाच्या मागील अरुंद गल्लीत गेले. तेथे जेसीबी व डंपरच्या साहाय्याने तेथील कचरा बाहेर काढून या गल्लीत फेरीवाल्यांसाठी पट्टे मारले.
याचप्रमाणे शहरात निश्चित झालेल्या ठिकाणी पट्टे मारण्याची कार्यवाही करण्यात आली; पण प्रमुख रस्त्यांवर तेथील व्यापारी व रहिवाशांनी आपल्या दारात फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यास विरोधाची भूमिका घेतल्याने काही ठिकाणी वादावादी झाली. वादावादी होणाऱ्या ठिकाण अतिक्रमण विभागाचे प्रमुख पंडितराव पोवार हे आपल्या पथकासह येऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते.

Web Title: Hawker zone campaign stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.