प्रति महिना दोन कोटी मागितले त्यांनी... अन्यथा येणार अनेक अडचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 01:29 PM2020-04-30T13:29:49+5:302020-04-30T13:31:48+5:30
कोल्हापूर : केएमटी प्रशासनास राज्य सरकारकडून प्रति महिना दोन कोटी रुपयांचे अनुदान मिळावे, अशी मागणी महापालिका परिवहन समिती सभापती ...
कोल्हापूर : केएमटी प्रशासनास राज्य सरकारकडून प्रति महिना दोन कोटी रुपयांचे अनुदान मिळावे, अशी मागणी महापालिका परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शासनाकडून लॉकडाऊन घोषित केल्यामुळे दि.२४ मार्चपासून संपूर्ण केएमटी बससेवा बंद ठेवण्यात आली असल्याने प्रवासी वाहतुकीपासून प्राप्त होणारे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे. अशा परिस्थितीतसुध्दा आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्याकरिता केएमटीकडून अत्यावश्यक सेवा म्हणून बसेस पुरविण्यात येत आहेत. के.एम.टी.चे उत्पन्नाचे स्रोत थांबलेले आहेत. परंतु, दैनंदिन वाहनांचे इंधन, कर्मचारी वेतन, शासकीय विमा, शासकीय कर, प्रॉव्ही. फंड यासारखा अत्यावश्यक खर्च करावा लागणार आहे.
सुमारे ८५० कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर नियमित खर्च भागविण्याकरिता राज्य शासनाकडून विशेष अनुदान देण्यात यावे, असे उत्तुरे यांनी निवेदनात म्हटले आहे. यावर पालकमंत्री पाटील यांनी तत्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे पत्र सादर करून प्रति महिना दोन कोटी विशेष अनुदान देण्याबाबत शिफारस केली आहे. यावेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई, महेश उत्तुरे व पी. एन. गुरव उपस्थित होते.