दुचाकीचोरीचा तपास करताना मोबाइल शाॅपी फोडल्याची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:03+5:302021-03-04T04:44:03+5:30
कोल्हापूर : मोपेड चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना चोरट्याने चक्क मोबाइल शॉपी फोडून तेथील मोबाइल चोरल्याचा गुन्हा कबूल केल्याने करवीर ...
कोल्हापूर : मोपेड चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना चोरट्याने चक्क मोबाइल शॉपी फोडून तेथील मोबाइल चोरल्याचा गुन्हा कबूल केल्याने करवीर पोलीस अचंबित झाले. ही घटना करवीर तालुक्यातील हळदी येथे घडली. अटक केलेल्याचे चोरट्याचे नाव विजय पंडित पाटील (वय १९, रा.हळदी) असे आहे. त्याच्याकडून चोरीतील मोपेड व मोबाइल असा सुमारे ९५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.२२ फेब्रुवारी रोजी चोरट्याने हळदी येथील एका गॅरेजचे कुलूप ग्रॅडरने तोडून आतील मोपेड चोरून नेल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केले असता गावातीलच विजय पाटील हा चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना मिळाले. पोलिसांनी त्याला सोमवारी सायंकाळी अटक केली, मंगळवारी सकाळी त्याला खाक्या दाखविला असता त्याने कुलूप तोडून मोपेड चोरल्याची कबुली दिली, पण त्याचसह लॉकडाऊन कालावधीमध्ये हळदी येथील महेश जाधव यांची मोबाइल शाॅपीही फोडून तेथील एक मोबाइल व ॲक्सेसरीज चोरल्याचेही त्याने कबुली दिल्याने पोलिस अचंबित झाले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची दुचाकी, मोबाइल व ॲक्सेसरीज जप्त केले.
शॉपीत रोजची ऊठबस
संशयित आरोपी विजय पाटील हा रोज सकाळी व सायंकाळी महेश मोबाइल शॉपीमध्ये जाऊन बसत होता. त्यामुळे मोबाइल शाॅपीचे मालक महेश जाधव याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. त्यातूनच त्याने दुकानाची टेहळणी करून लॉकडाऊन कालावधीत मोबाइल शॉपी फोडल्याची कबुली दिली.