उच्चपदस्थ नोकरी सोडून तो झाला फिरस्त्यांचा ‘डॉक्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:01 AM2019-01-16T01:01:06+5:302019-01-16T01:01:10+5:30

प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सर्वसामान्य माणसांच्या फक्त डोळ्यातील अश्रू न पाहता ते पुसण्याचे दातृत्व असलेले ...

He left the top job and became a 'doctor' | उच्चपदस्थ नोकरी सोडून तो झाला फिरस्त्यांचा ‘डॉक्टर’

उच्चपदस्थ नोकरी सोडून तो झाला फिरस्त्यांचा ‘डॉक्टर’

Next

प्रदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सर्वसामान्य माणसांच्या फक्त डोळ्यातील अश्रू न पाहता ते पुसण्याचे दातृत्व असलेले प्रफुल्लकुमार हुपरीकर हे आज फिरस्त्यांचे ‘डॉक्टर’ म्हणून ओळखू लागले आहेत. कारणही तसेच आहे. फिरस्त्यांना दोन वेळच्या जेवणाची परवड, त्यामध्येच एकाद्या वेळी गंभीर दुखापत, आजारपण आल्यास कुठे आलेत उपचारांसाठी पैसे. अशा लोकांवर हुपरीकर यांच्यामार्फत मोफत औषधोपचार केले जातात.
प्रफुल्लकुमार हुपरीकर यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी स्वीकारली. या ठिकाणी त्यांना पदोन्नतीही मिळाली. या दरम्यान ‘बायबल’ वाचनाने त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्यांना दुबई येथील आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी मिळाली. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या उपकारातून उतराई होण्याची गरज आहे, हा निर्णय पक्का केला. दुबईतील नोकरी नाकारत चांगल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते रस्त्यावर आले.
प्रथम शहरात फिरून एखाद्या फिरस्त्यावर औषधोपचारांची गरज असल्यास त्याला दवाख्यानात घेऊन जाऊन त्याच्यावर उपचार करू लागले. या कामातून त्यांना समाधान मिळू लागले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानसशास्त्राचा कोर्सही केला. त्यामुळे त्यांना या फिरस्त्यांसोबत संवाद साधण्यास मदत मिळाली.
हे काम सुरू असताना ते ‘होप मूव्हमेंट इंडिया’ या सामाजिक संस्थेमार्फत गरीब, गरजू लोकांसाठी काम करू लागले. पैसे नसल्या कारणाने अनेक लोक योग्यवेळी तपासणी करू शकत नाहीत. अशा लोकांसाठी अल्पदरात ते तपासणी करून देण्यासाठी मदत करू लागले. हुपरीकर यांच्यामुळे आज अनेकांच्या जीवनात आनंद फुलला आहे. यासोबत त्यांनी हॉटेल कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औद्योगिक कामगारांसाठी अल्पदरात रेनकोट, बुटांचे वाटप, असेही उपक्रम राबवले.
‘डॉक्टर’ अशीच ओळख....
प्रफुल्लकुमार हुपरीकर यांच्याकडे वैद्यकीय शास्त्रामधील पदवी नसली तरी गरीब व गरजू लोकांना ते वैद्यकीय अडचणीबाबत मदत करतात. म्हणून सामान्य लोक त्यांना ‘डॉक्टर’ म्हणूनच हाक मारतात. प्रेमाने तेही या हाकेवर त्यांच्या मदतीसाठी धावून जातात.

Web Title: He left the top job and became a 'doctor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.