... किती हे धाडस ; त्याने दिली मुंडकी उडवून देण्याची धमकी...महापालिका कर्मचाऱ्यावर केला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:33 AM2020-04-24T11:33:49+5:302020-04-24T11:37:26+5:30
आयुब मकानदारने संदीप उबाळे यांच्यावर हल्ला चढविला. त्यांची कॉलर पकडून शर्ट फाडला. धक्काबुक्की केली. त्यांचे ओळखपत्र तोडून टाकले. अनेक व्यक्तींनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला; पण हिसडे मारून मकानदार पुन:पुन्हा कर्मचा-यांना धक्काबुक्की करायला लागला.
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क व हॅँडग्लोव्हजचा वापर केला नाही म्हणून माल जप्त करायला गेलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर एका भाजी विक्रेत्याने अनपेक्षित हल्ला चढविला. ‘तुम्ही येथून जावा; नाही तर तुमची मुंडकी उडवून देतो,’ अशा शब्दांत त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी सकाळी १०.३० वाजता अयोध्या पार्कसमोर घडला. या प्रकरणी संबंधित विक्रेत्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
शहरात सध्या भाजी मंडईचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून काही विक्रेत्यांना ताराराणी चौक ते टेंबलाई उड्डाणपूल रस्त्यावर भाजीविक्रीस परवानगी दिली आहे. त्या ठिकाणी बसणा-या सर्व विक्रेत्यांना मास्क व हॅँडग्लोव्हज घालण्याची सक्ती केली आहे; परंतु भाजी विक्रेते ते वापरत नाहीत. वारंवार सूचना देऊनही ते ऐकत नाहीत म्हटल्यावर गुरुवारी सकाळी १०.३० वाजता उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, प्रभाग सचिव संदीप उबाळे, मदन भांदिगरे, शेखर कोल्हे, दुष्यंत पाटील, महेश माने, आदी कर्मचारी कारवाई करण्याच्या हेतूने तेथे गेले.
अयोध्या पार्कसमोरील फूटपाथवर आयुब नसीर मकानदार ( वय १७, रा. इंदिरानगर झोपटपट्टी, शिवाजी पार्क) हा विक्रेता मास्क व हॅँडग्लोव्हज न वापरताच भाजीविक्री करताना आढळला. त्यावेळी महापालिकेच्या कर्मचाºयांनी त्याची भाजी जप्त करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी आयुब मकानदारने संदीप उबाळे यांच्यावर हल्ला चढविला. त्यांची कॉलर पकडून शर्ट फाडला. धक्काबुक्की केली. त्यांचे ओळखपत्र तोडून टाकले. अनेक व्यक्तींनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला; पण हिसडे मारून मकानदार पुन:पुन्हा कर्मचा-यांना धक्काबुक्की करायला लागला. पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर साध्या गणवेशात आलेल्या पोलिसांच्या अंगावरही मकानदार धावला.
पोलीस आल्यावरही मकानदार शांत न होता तो धमक्या देतच होता, ‘तुम्ही येथून जावा नाही तर तुमची मुंडकी उडवून देतो, तुम्हाला ठार मारतो’ अशा धमक्या तो देऊ लागला. शेवटी पोलिसांनी त्याला पकडून शाहूपुरी ठाण्यात नेले. तेथे प्रभाग सचिव संदीप उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मकानदार याच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात आला.