साडेबावीस लाख रुपये घेतले, व्याजासह ७५ लाखांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:26 AM2021-03-01T04:26:57+5:302021-03-01T04:26:57+5:30
कोल्हापूर : केबल व्यवसायासाठी हातउसने घेतलेले २२ लाख ५० हजार रुपये हे २० टक्के व्याजासह ७५ लाख रुपये परत ...
कोल्हापूर : केबल व्यवसायासाठी हातउसने घेतलेले २२ लाख ५० हजार रुपये हे २० टक्के व्याजासह ७५ लाख रुपये परत करा अन्यथा तुम्हाला जगू देत नाही, तुमची गाडी काढून घेऊ अशी घरात घुसून धमकी देण्याचा प्रकार केर्ली (ता. करवीर) येथे घडला. याप्रकरणी खासगी सावकार राजेश विजय लायकर (वय ३८) त्यांची पत्नी सुमेधा लायकर (दोघेही रा. कारंडे मळा) यांच्यासह अनोळखी दोघे अशा चौघां संशयितावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती की, केर्ली येथील पांडूरंग गायकवाड याने केबल व्यवसायासाठी राजेश लायकर याच्याकडून २२ लाख ५० हजार रुपये हातउसने, विनामोबदला घेतले होते. त्यापैकी १६ हजार ३७ हजार रुपये पांडूरंग गायकवाड यांनी वेळोवेळी रोखीने परत केले आहेत. पण संशयित आरोपी लायकर पती-पत्नी यांनी मीना गायकवाड यांच्या घरात घुसून २० टक्के व्याजाने तुम्हाला पैसे दिलेत, ते व्याजासह परत द्या, असे सांगून त्यांना शिवीगाळ व धमकी दिली. पती पांडूरंग गायकवाड हे घरात नसतानाही संशयित लायकर दाम्पत्यासह एकूण चौघांनी घरात घुसून व्याजासह सुमरे ७५ लाख रुपये द्या, नाहीतर तुम्हाला जगू देणार नाही अशा धमक्या दिल्या. ही घटना ऑक्टोबर २०१९ ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत घडले. याप्रकरणी मीना पांडूरंग गायकवाड यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार लायकर दाम्पत्यावर महाराष्ट्र सावकारी नियमनअंतर्गत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.