ढेकणेचा न्यायालयातून पलायनाचा प्रयत्न
By admin | Published: January 8, 2016 11:59 PM2016-01-08T23:59:53+5:302016-01-09T00:41:42+5:30
कुख्यात गुंड : कॉन्स्टेबल चौगले यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून केले जेरबंद
कोल्हापूर : स्वत:चे अस्तित्व लपविण्यासाठी सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील सेंट्रिंग कामगार दत्तात्रय नायकुडे याच्या खूनप्रकरणी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कुख्यात गुंड लहू रामचंद्र ढेकणे (वय ३९, रा. देगाव, ता. भोर, जि. पुणे) याने शुक्रवारी दुपारी टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
कॉन्स्टेबल राजेंद्र केरबा चौगले (४२) यांनी न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी टाकून ढेकणेला जेरबंद केले. अवघ्या पाच ते दहा मिनिटांचा हा थरार पाहून वकिलांसह पक्षकार जाग्यावरच थबकले. वीस फुटांवरून खाली उडी मारल्याने कॉन्स्टेबल चौगले यांच्या पायास दुखापत झाली.
पुणे-सातारा जिल्ह्यांत खंडणीसाठी शाळकरी मुलांचे अपहरण करून केलेल्या दोन खून प्रकरणांत लहू ढेकणे याला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यानंतर तो कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. डिसेंबर २०१४ मध्ये कारागृहातून पॅरोलवर तो बाहेर पडला. त्यानंतर स्वत:चे अस्तित्व लपविण्यासाठी त्याने १५ मे २०१५ रोजी सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील सेंट्रिंग कामगार दत्तात्रय नायकुडे याचा कोल्हापुरातील गिरगाव येथील भारती विद्यापीठाच्या परिसरातील गवती डोंगरावर दारू पाजून मुंडके व हातांचे पंजे धडावेगळे करून निर्घृण खून केला. त्या मृतदेहास आपले कपडे घालून ओळखपत्र व डायरी जवळ ठेवून स्वत:च्या खुनाचा बनाव केला. परंतु त्याचा हा बनाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी २२ मे रोजी उघडकीस आणला.
त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. त्यानंतर करवीर पोलिसांनी त्याला अटक करून त्याची ५ जून २०१५ ला न्यायालयाच्या आदेशानुसार कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी भक्कम पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
न्यायालयातील थरार
गुंड ढेकणे याला कारागृहातील अंडासेल बॅरेकमध्ये स्वतंत्र ठेवले होते. शुक्रवारी त्याच्यावरील खून खटल्याची सुनावणी असल्याने पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल मधुकर मोहिते, राजेंद्र चौगले, रविंद्र जगताप व सुप्रिया चौगले यांची त्याच्यासह अन्य खटल्यातील दोघा आरोपींची कळंबा कारागृहातून न्यायालयात व तेथून परत कारागृहात सोडण्याची जबाबदारी होती. त्यानुसार ते सकाळी अकराच्या सुमारास पोलीस व्हॅनमधून त्याच्यासह तिघांना न्यायालयात घेऊन आले. त्याच्या हाताला बेडी होती. मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एल. खंबायते यांच्यासमोर त्याला हजर केले.
यावेळी सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश खंबायते यांनी पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी ठेवली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता राजेंद्र चौगले यांनी त्याला बाहेरील बाकड्यावर नेऊन बसविले. ते त्याच्या शेजारीच हाताची बेडी पकडून उभे होते. अन्य कर्मचारी न्यायालयीन कागदपत्रांची देवाण-घेवाण करण्यात व्यस्त होते. या संधीचा फायदा घेत बाकड्यावरून उठून त्याने कॉन्स्टेबल चौगले यांच्या हाताला जोराचा हिसडा देत चौथ्या मजल्याच्या जिन्यावरून पळत खाली सुटला. जिन्यावरून वकील व पक्षकारांची लगबग सुरू होती. त्यामुळे कॉन्स्टेबल चौगले यांनी चौथ्या मजल्यावरून खाली दुसऱ्या मजल्यावर थेट उडी मारली. तेथून न्यायालयाच्या पाठीमागील दरवाजातून पळून जाणाऱ्या ढेकणेची कॉलर पकडून त्याला जेरबंद केले. उडी मारल्याने पायाला दुखापत होऊन चौगले जखमी झाले. सुमारे पाच ते सात मिनिटांच्या थरारामध्ये बंदोबस्तास असणाऱ्या अन्य पोलिसांना घाम फुटला. वकील व पक्षकार भयभीत झाले. ढेकणे याच्यासोबत अन्य खटल्यातील दोघे आरोपी हा सर्व प्रकार बघत न्यायालयाच्या दारातच थांबून होते. या प्रकारानंतर त्याला बेड्या व दोरखंडाने हात बांधून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी हेड कॉन्स्टेबल मधुकर मोहिते यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानंतर सीपीआरमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याची कारागृहात रवानगी केली.
जिवाचं बरंवाईट करून घेणार
लहू ढेकणे याला कॉन्स्टेबल चौगले यांनी पकडले. यावेळी तो ‘मला त्रास दिलासा तर मी जिवाचं बरवाईट करून घेणार, कारागृहात मला खूप त्रास दिलाय’ असे मोठमोठ्याने ओरडत होता. पोलीस आता आपणाला खाकी प्रसाद देतील, या भीतीपोटी तो त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत होता.
तर नोकरीवर गडांतर...
लहू ढेकणे हा पळून जाण्यात यशस्वी झाला असता, तर चौघा पोलिसांना नोकरी गमवावी लागली असती. हवालदार मधुकर मोहिते यांना सेवानिवृत्तिसाठी अवघे सहा महिने उरले आहेत. ‘आमचे नशीब चांगले, ढेकणे सापडला,’ असे भावविवश होऊन मोहिते यांनी मन मोकळे केले.