सिनेस्टार सलमान खानला दिली धमकी ; ‘त्याला’ दुनिया हलवून सोडायची होती...: गँगस्टार शामलालचे कारनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:04 AM2020-02-01T11:04:16+5:302020-02-01T11:08:29+5:30
स्वत: ‘माफिया डॉन’ बनून दरारा निर्माण करायचा होता. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्याने सिनेस्टार सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली होती. परंतु, गँगस्टार शामलाल पुनिया ऊर्फ बिष्णोई याचे मनसुबे पूर्ण होण्याआधीच कोल्हापूरच्या पोलिसांनी त्याला ‘मोक्का’ लावून बेचिराख केल्याने राजस्थान पोलिसांना दिलासा मिळाला आहे.
एकनाथ पाटील
कोल्हापूर : घरची परिस्थिती गरिबीची, शिक्षणाचा अभाव, वारंवार डिवचून केलेला अपमान, त्यातून त्याने काहीतरी वेगळे करण्याचा निश्चय केला आणि कोवळ्या वयात सहजच मिळालेल्या कुसंगतीमुळे त्याची पावले गुन्हेगारी विश्वाकडे वळली अन् अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षी तो राजस्थानमधील ‘००७’ या टोळीचा गँगस्टर बनला. त्याला दुनिया हलवून सोडायची होती. स्वत: ‘माफिया डॉन’ बनून दरारा निर्माण करायचा होता. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्याने सिनेस्टार सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली होती. परंतु, गँगस्टार शामलाल पुनिया ऊर्फ बिष्णोई याचे मनसुबे पूर्ण होण्याआधीच कोल्हापूरच्या पोलिसांनी त्याला ‘मोक्का’ लावून बेचिराख केल्याने राजस्थान पोलिसांना दिलासा मिळाला आहे.
राजस्थानमधील बिष्णोई गँगचा म्होरक्या शामलाल हा जोधपूर जिल्ह्यातील भोजासर गावातील सर्वसामान्य कुटुंबातील. आई-वडील मोलमजुरी करतात. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्याला दहावीच्या शिक्षणानंतर अनेक अडचणी येऊ लागल्या. त्याला गावातील लोक ‘तू काही करू शकणार नाहीस, पुढे जाऊ शकणार नाहीस, आयुष्यभर भिकारी राहणार,’ असे म्हणून अपमानित करीत होते. त्याने मनाशी निश्चय केला, मला काहीतरी केलं पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे, शामलालने काहीतरी करून दाखविले. त्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करू लागला; परंतु नशीब त्याला साथ देत नव्हते.
जोधपूरमध्ये लॉरेंश बिष्णोई याची मोठी दहशत होती. गँगस्टर असूनही येथील लोक त्याला दैवत मानत होते. वाढत्या गुन्हेगारीमुळे येथील पोलिसांनी त्याचा त्याच्या राहत्या घरी एन्कौंटर केला. गँगस्टार लॉरेंशचा शामलालवर मोठा प्रभाव होता. तेथून त्याने वेगळा रस्ता धरत राजस्थानमध्ये ‘००७’ नावाची गँग उभी केली. हातामध्ये पिस्टल घेऊन फायर करणे असे व्हिडीओ बनवून, त्याने यू ट्यूबवर स्वत:चे चॅनेल सुरू करून राजस्थानमध्ये प्रचंड दहशत माजविली. त्याचे थरारक व्हिडीओ पाहून १६ ते २० वयोगटांतील तरुण त्याच्या गँगमध्ये सहभागी झाले. ठार मारण्याची धमकी देऊन त्यांनी अनेक व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केली. जिवाच्या भीतीने त्याच्याविरोधात कोणी तक्रार देण्यास पुढे येत नव्हते.
काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयात सिनेस्टार सलमान खान तारखेला येणार होता. ही संधी साधूून शामलालने सोशल मीडियावरून ‘सलमान, तू भारत के कानून से बचेगा; लेकिन शामलाल के कानून से नहीं बचेगा...! जोधपूर आयेगा उस दिन दहाडे मारूॅॅँगा...!’ अशी धमकी दिली होती. या धमकीच्या प्रकरणाने राजस्थान पोलिसांची दमछाक झाली होती. बिष्णोई गँगच्या दहशतीमुळे सलमान जोधपूरला आलाच नाही. राजस्थानमधील काही पोलीसही या गॅँगला सामील असल्यामुळे या गॅँगची दहशत वाढतच राहिली. अवघ्या तीन वर्षांत शामलालची लाईफ-स्टाईल बदलली. तो राजस्थानमधील सामाजिक कार्यक्रमांत सक्रिय होत होता. समाजाचे सगळे नियम तो पाळत होता. त्यामुळे अनेक लोकांचा तो फॅन बनला. आपला पाठिराखा म्हणून त्याला अनेकजण रसद पुरवू लागले. सुमारे ४८ गंभीर गुन्हे दाखल असलेला शामलालच्या मागावर राजस्थान पोलीस होते. त्यांना चकवा देऊन तो कोल्हापूरच्या दिशेने आला आणि इथेच जेरबंद झाला.
राजस्थानमध्ये बिष्णोई गँगशी चकमक झाली असती तर तेथील त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणली असती.
- नरेंद्र पुनिया, राजस्थान पोलीस दलाच्या गुन्हे शाखेचे अधिकारी