मुश्रीफ यांना शंभर टक्के पाडायचं, शरद पवार यांचे गडहिंग्लज-कागलकरांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 01:48 PM2024-11-16T13:48:52+5:302024-11-16T13:49:44+5:30

''आम्ही पवार साहेबांना सांगूनच तिकडं गेलो, असं ही मंडळी निर्लज्जपणे सांगतात''

He wanted to defeat Hasan Mushrif one hundred percent Sharad Pawar appeal to Gadhinglaj-Kagalkar | मुश्रीफ यांना शंभर टक्के पाडायचं, शरद पवार यांचे गडहिंग्लज-कागलकरांना आवाहन 

मुश्रीफ यांना शंभर टक्के पाडायचं, शरद पवार यांचे गडहिंग्लज-कागलकरांना आवाहन 

गडहिंग्लज : हसन मुश्रीफ यांना समाजातील लहान घटकाचा प्रतिनिधी म्हणून आपण आमदार आणि ऐतिहासिक कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मंत्रीही केले. लोकांनी त्यांना भाजपच्या विरोधात मत देऊनही ते भीतीपोटीच भाजपसोबत गेले. परंतु, ईडीच्या अधिकाऱ्यांनी ती फाइल टेबलावरून कपाटात ठेवली असून उद्या ती पुन्हा उघडली जाईल. त्यामुळे लोकांशी प्रतारणा केलेल्या मुश्रीफ यांना शंभर टक्के पाडा, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले.

कागल विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारार्थ येथील म.दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. खासदार शाहू छत्रपती, ‘चंदगड’च्या उमेदवार नंदिनी बाभूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पवार म्हणाले, मोदी सरकारकडून महाराष्ट्राला सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. त्यावेळी सर्वांनी संघटितपणे उभे राहण्याची गरज होती. परंतु, काही मंडळी भाजपसोबत गेली. त्यात मुश्रीफही आहेत. ‘असा त्रास देण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला,’ असे त्यांच्या कुटुंबातील महिलांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. तरीदेखील मुश्रीफांनी हा उद्योग केला, त्यांना धडा शिकवा.

खासदार शाहू छत्रपती म्हणाले, भ्रष्टाचार, टक्केवारीमुक्त महाराष्ट्रासाठी परिवर्तनाची गरज आहे. समरजित यांच्यामुळे कागलमधील गणित बदलले आहे.

समरजित घाटगे म्हणाले, पैशाच्या महापुरापासून परिवर्तनाच्या रक्षणाची जबाबदारी उत्तूर, कडगाव, गडहिंग्लजकरांवरच आहे. प्रकाश शहापूरकर म्हणाले, मुश्रीफांचे भाजपप्रेम सत्तेसाठीच आहे. कामगारमंत्री असतानाही ते गडहिंग्लजच्या एमआयडीसीत उद्योग आणू शकले नाहीत. त्यांच्यामुळेच काही उद्योग परत गेले.

उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, कागल- गडहिंग्लजच्या जनतेने पालकमंत्र्यांचा चांगलाच बंदोबस्त केला आहे. खुर्चीच्या भीतीमुळेच ते जिल्ह्यात कुणाच्याही प्रचाराला आलेले नाहीत. याप्रसंगी आर.के. पोवार, किसनराव कुराडे, अनिल घाटगे, दिलीप माने, शिवाजी खोत, बसवराज आजरी, शिवाजी मगदूम, सुकुमार कांबळे, निवृत्ती देसाई, अकबर मांडवीकर यांचीही भाषणे झाली. मेळाव्याला व्ही.बी. पाटील, नवोदिता घाटगे, प्रवीणसिंह घाटगे, सुनील शिंत्रे, सुरेश कुराडे, संग्रामसिंह नलवडे, संजय पोवार, बाळेश नाईक उपस्थित होते. शिवानंद माळी यांनी आभार मानले.

मोबाइलचा टॉर्च लावून पाठिंबा

मुश्रीफ विश्वासघातकी, घोटाळेबाज आहेत. त्यांच्या दलालांनी गडहिंग्लज शहरच विकायला काढले आहे. म्हणूनच परिवर्तनासाठी पवार साहेबांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी करताच उपस्थितांनी मोबाइलचा टॉर्च लावून आपला पाठिंबा दर्शविला.

झक मारायची अन् दुसऱ्याचं नाव घ्यायचं

आम्ही पवार साहेबांना सांगूनच तिकडं गेलो, असं ही मंडळी निर्लज्जपणे सांगतात. आपण झक मारायची अन् दुसऱ्याचं नाव घ्यायचं, असाच हा प्रकार आहे. म्हणूनच त्यांना ‘पाडलं पाहिजे, पाडलं पाहिजे, पाडलं पाहिजे’ असे शरद पवार यांनी सांगितले.

Web Title: He wanted to defeat Hasan Mushrif one hundred percent Sharad Pawar appeal to Gadhinglaj-Kagalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.