Kolhapur News: बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला, विजेच्या धक्क्याने तरुण वायरमनचा मृत्यू झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 05:28 PM2023-06-15T17:28:42+5:302023-06-15T17:29:03+5:30

महावितरणच्या खांबावर काम करताना विजेचा धक्का बसला

He was electrocuted while working on a Mahavitran pole, The young wireman died in Gaganbawada Kolhapur district | Kolhapur News: बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला, विजेच्या धक्क्याने तरुण वायरमनचा मृत्यू झाला

Kolhapur News: बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला, विजेच्या धक्क्याने तरुण वायरमनचा मृत्यू झाला

googlenewsNext

गगनबावडा : महावितरणच्या खांबावर काम करत असताना विजेचा धक्का बसल्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू झाला. गगनबावडा तालुक्यातील पळसंबेपैकी मानेवाडी येथे आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. अमित प्रकाश माने (वय २५ वर्षे), रा. पळसंबे असे तरुणाचे नाव आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, महावितरण कंपनीच्या गगनबावडा उपविभागांतर्गत येणाऱ्या पळसंबे या गावात अमित माने हा वीज वितरणचा कंत्राटी वायरमन म्हणून गेली अनेक वर्षे काम करत होता. आज दुपारी तो वीजपुरवठा दुरुस्त करण्यासाठी विजेच्या खांबावर चढला असता त्याला विजेचा जोराचा धक्का बसला. अमितला उपचारासाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. 

तालुक्यातील आसपासच्या ग्रामस्थांनी गगनबावडा उपविभागीय महावितरण कार्यालयावर धाव घेतली. ही घटना वीज वितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे घडल्यांचा आक्षेप घेत संबंधित कर्मचाऱ्यासह जबाबदार अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी गगनबावडा येथे येऊन ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका जमावाने घेत ठिय्या आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी गगनबावड्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी मोठा फौजफाटा मागवून घेतला. घटना घडून पाच तास उलटले तरी वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी गगनबावडा कार्यालयाजवळ पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे जमाव संतप्त झाला.

कोल्हापूर ग्रामीणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता साळी हे रात्री साडेसातच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी दिलेले आश्वासन अमान्य झाल्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. संतप्त जमावाला वीज वितरण कडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी जमाव पोलिस स्टेशनकडे वळला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला

मयत अमित याचा दोनच दिवसांपूर्वी विवाह ठरला होता. विवाह मुळे त्याच्या घरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वीच आज त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अमित याच्या पश्चात आई, वडील व एक विवाहित बहीण आहे.
 

Web Title: He was electrocuted while working on a Mahavitran pole, The young wireman died in Gaganbawada Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.