उशीर झाल्याने परीक्षेस बसू दिलं नाही; संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा
By संदीप आडनाईक | Published: January 23, 2023 10:17 PM2023-01-23T22:17:14+5:302023-01-23T22:18:37+5:30
संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक नीलेश सुतार यांनी गावाबाहेर उभारलेले हे परीक्षा केंद्र शहराच्या मध्यवस्तीत सुरू करण्याची मागणी केली आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : काही मिनिटे उशीर झाला म्हणून केंद्र सरकारच्या कर्मचारी सेवा आयोगाच्या शिये (ता. करवीर) येथील परीक्षा केंद्रावर प्रवेश न दिल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी केंद्राबाहेर आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडने या विद्यार्थ्यांची बाजू घेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. एजन्सीने पुन्हा अशाप्रकारे अन्याय केल्यास प्रसंगी परीक्षा केंद्र फोडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक नीलेश सुतार यांनी गावाबाहेर उभारलेले हे परीक्षा केंद्र शहराच्या मध्यवस्तीत सुरू करण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचारी सेवा आयोगासाठी टीसीएस आयओएन डिजिटल झोन या एजन्सीमार्फत शिये येथे परीक्षा केंद्र चालवण्यात येते. सोमवारी या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी परजिल्ह्यांतून आले होते. मात्र, त्यांना हे केंद्र सापडण्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी सुरू झालेल्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता आले नाही. काहींना तर अवघी काही मिनिटे उशीर झाल्याने, केंद्र चालकांनी परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे केंद्राबाहेर शेकडो संतप्त विद्यार्थी आंदोलन करत होते. संभाजी ब्रिगेडला याची माहिती मिळताच त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुखांच्या भेटीची मागणी केली, परंतु त्यांनी भेट घेतली नाही, त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक सुतार, विकास भिऊंगडे, अमोल गावडे, अक्षय वडार, भगवान कोइंगडे, चारुशीला पाटील, रंजना पाटील, सीमा सरनोबत उपस्थित होते.
पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी
दरम्यान, शेकडो विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न निर्माण झाल्याने, संभाजी ब्रिगेडने तत्काळ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेत, परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. संबंधित परीक्षा केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू करण्याची मागणी केली आहे.