खरेदीला बाहेर पडले अन् रुग्णालयात झाले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:25 AM2021-04-20T04:25:31+5:302021-04-20T04:25:31+5:30
संचारबंदी असतानाही खरेदीचे कारण सांगून घराबाहेर पडून विनाकारण शहरात फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने घेतला ...
संचारबंदी असतानाही खरेदीचे कारण सांगून घराबाहेर पडून विनाकारण शहरात फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात अशी चाचणी करण्यात येत आहे. गेल्या सोमवारी कपिलतीर्थ भाजी मंडईत चौदा तर रविवारी लक्ष्मीपुरीतील सहा व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या होत्या. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. अनेक कोरोनाबाधित शहरातून फिरत आहेत.
सोमवारी मिरजकर तिकटी येथे महापालिका पथकाने काही नागरिकांना अडवून त्यांची सक्तीने रॅपिड ॲन्टिजन चाचणी केली. त्यावेळी सहा नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये एकूण १४९ नागरिकांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी १४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ग्रामीण भागातून व शहरातून आलेले सहा नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये पाचगाव येथील एक, किणी वाठार येथील एक, गुजरी परिसरातील दोन, शिवाजी पेठ परिसरातील दोन नागरिकांचा समावेश आहे.
दोन दिवसांपूर्वी रॅपिड ॲन्टिजन टेस्ट बिंदू चौक व लक्ष्मीपुरी येथे घेण्यात आली. यावेळी ७६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सहा नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व कोरोनाबाधित नागरिकांना डीओटी सेंटरला व किणी वठार येथील नागरिकाला पारगाव येथील कोविड सेंटरला ठेवण्यात आले आहे.
शहरात गर्दीच्या ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता आहे. म्हणून नागरिकांनी गर्दी टाळावी व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
(फोटो केएमसी ०१ नावाने देत आहे)