‘राजाराम’च्या कर्जाबाबत दिशाभूल करणाऱ्यांना खुलासेवार उत्तर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:24 AM2021-03-18T04:24:32+5:302021-03-18T04:24:32+5:30
कारखान्याबाबत अपप्रचार थांबवावा कसबा बावडा : ‘राजाराम’च्या कर्जाबाबत सभासदांची दिशाभूल करणाऱ्या प्रश्नकर्त्या सभासदांच्या प्रत्येक प्रश्नाला लेखी उत्तर पाठवण्यात येणार ...
कारखान्याबाबत अपप्रचार थांबवावा
कसबा बावडा : ‘राजाराम’च्या कर्जाबाबत सभासदांची दिशाभूल करणाऱ्या प्रश्नकर्त्या सभासदांच्या प्रत्येक प्रश्नाला लेखी उत्तर पाठवण्यात येणार असून, सर्व उत्तरे कारखान्याच्या ‘श्री. छत्रपती राजाराम ॲपवर’ सभासदांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली जाणार आहेत. तरीही वारंवार तेच ते प्रश्न उपस्थित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे द्या हा कांगावा कशासाठी, असा सवाल राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप उलपे यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिला आहे.
राजाराम कारखाना सहवीज प्रकल्प व कारखान्याचे विस्तारीकरण करणार आहे. कारखान्यावर कर्ज असताना हा विस्तारीकरणाचा घाट कशासाठी याचा वार्षिक सभेत खुलासा करावा व लेखी प्रश्नांची उत्तरे द्यावीत म्हणून बावड्यातील शेतकऱ्यांनी कारखान्याकडे लेखी प्रश्न पाठवले होते. तसेच याची प्रत साखर सहसंचालक यांनाही पाठवली होती. याबाबत कारखान्याचे संचालक दिलीप उलपे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे या प्रश्नांबाबत खुलासा केला आहे.
पत्रकात म्हटले आहे, सभासद हिताच्या दृष्टिकोनातून त्यांचा ऊस वेळेत गळीत होण्याकरता विस्तारीकरण अपरिहार्य असून, मागील वार्षिक सभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे सहवीज प्रकल्पाबाबत किफायतशीरपणा तपासून याबाबतची कार्यवाही करणार आहोत. उत्पादक शेतकऱ्यांना किफायतशीर ऊस दर देण्याकरिता साखर कारखान्यातून उपपदार्थ निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारची भूमिका ही यासाठी अनुकूल अशीच आहे. ही वास्तव स्थिती असताना वारंवार तेच तेच प्रश्न उपस्थित करून सभासद शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या कडून केला जात आहे. सभासद शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आता तरी अशा प्रकारचा अपप्रचार थांबवावा, असा गर्भित इशाराही दिलीप उलपे यांनी दिला आहे.
कारखान्याच्या अहवाल सालातील कर्जाबाबत विरोधकांकडून अवास्तव व चुकीची आकडेवारी दिली जात आहे. वस्तुस्थिती विचारात घेतल्यास कारखान्याकडे जी एकूण कर्ज रक्कम २६८ कोटी ताळेबंदास दिसून येते त्यापैकी साखर मालतारण कर्ज १६५ कोटी इतकी आहे. पण त्यावेळी प्रत्यक्षात १७४ कोटी रकमेची साखर कारखान्याकडे शिल्लक होती. शिवाय या एकूण कर्ज रक्कमेमध्ये नमूद असलेल्या इतर देणी रकमा अदा करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या रकमा एकूण कर्जात दर्शवून दिशाभूल केली जात आहे. हेसुद्धा सुज्ञ सभासद ओळखून आहेत. अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. ...................... ---------------------------------------------