परिचारक यांना आजी-माजी सैनिक देतील ते प्रायश्चित्त घ्यावेच लागेल
By admin | Published: February 20, 2017 11:46 PM2017-02-20T23:46:14+5:302017-02-20T23:46:14+5:30
उदयनराजे भोसले ; सैनिकांविषयीच्या बेताल वक्तव्याचा निषेध
सातारा : ‘देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांविषयी प्रशांत परिचारक यांनी अश्लील विधान करून, सैनिकांविषयी त्यांची असलेली विकृत मनोवृत्ती दाखवून दिली आहे. देशासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून लढणाऱ्या सैनिकांविषयी त्यांची अशी मानसिकता असेल तर त्यांनी आमदार म्हणून सोडाच; पण माणूस म्हणूनही जगण्याचा अधिकार गमावला आहे. त्यांना आता महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आजी-माजी सैनिक देतील ते प्रायश्चित्त घ्यावेच लागेल,’ अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘देशाच्या रक्षणार्थ असलेल्या सैनिकांप्रती नितांत आदर तमाम देशवासीयांच्या मनामध्ये आहे आणि तो असला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. ‘जय जवान आणि जय किसान’ हा नारा या देशात दिला गेला. आजी-माजी सैनिकांची गौरवशाली परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे. त्याच महाराष्ट्रातील सोलापूरच्या भूमीत
एक करंटा आमदार सैनिकांविषयी उदाहरण देऊन, तमाम सैनिकांची मानहानी करतो, हे निश्चितच कोणत्या दिशेने राजकारणी
मंडळी चालली आहे हे दिसून येत आहे.
कुठे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आणि कुठे प्रशांत परिचारक. धनशक्तीवर एमएलसीत गेले. हा देश जरुर राजकारण्यांमुळे चालतो. तथापि, त्याही पेक्षा निधड्या छातीच्या सैनिकांमुळे चालतो याचे तारतम्य त्यांनी बोलताना बाळगले पाहिजे होते. त्यांनी आजी सैनिकांचा अपमान केला आहेच त्याही पेक्षा आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबीयांचा, सामान्य जनतेचाही घोर अपमान केला आहे. त्यांना आता एमएलसी
ऐवजी एमएलआयच्या कोल्हापूर किंवा बेळगावच्या मुख्यालयात सोडले पाहिजे म्हणजे ते बाहेर
येईलच असे नाही आणि आलेच तर त्यांच्या कुटुंबीयांना ओळखणार देखील नाही.
आजी-माजी सैनिक सांगतील ते प्रायश्चित्त त्यांनी आपणहून घ्यावे अन्यथा त्यांना योग्य ते प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडू,’ असा इशाराही खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)