नरके-हाळवणकर समन्वय समितीचे प्रमुख
By admin | Published: February 9, 2015 12:33 AM2015-02-09T00:33:52+5:302015-02-09T00:36:26+5:30
युतीच्या आमदारांच्या बैठकीत निर्णय : शासकीय कमिट्या नियुक्तीबाबत झाली चर्चा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील युतीच्या आमदारांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. यामध्ये दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीचे प्रमुख म्हणून आमदार चंद्रदीप नरके व आमदार सुरेश हाळवणकर यांची निवड केल्याचे समजते. यामध्ये शासकीय समित्यांसह इतर नियुक्त्यांमध्ये मित्रपक्षांना किती वाटा द्यायचा याविषयीही चर्चा झाल्याचे समजते. जिल्ह्णातील शिवसेना, भाजपसह मित्रपक्षांमध्ये समन्वय राहावा, यासाठी पालकमंत्री पाटील यांनी युतीच्या आमदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. शिवसेना, भाजप, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांमध्ये समन्वयाने काम करण्याचा निर्णय बैठकीच्या सुरुवातीला घेण्यात आला. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी वाटप असो अथवा शासकीय समित्या; यामध्ये सर्व मित्रपक्षांना सामावून घेऊन कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्रपक्षांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी आमदार चंद्रदीप नरके व आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
बैठकीत जिल्हा नियोजन मंडळाकडून वाटप करण्यात येणाऱ्या निधीबाबतही चर्चा झाली. मार्चअखेर जवळ आल्याने नियोजन मंडळाच्या निधीतील कामे लवकरच सुचविण्यास मंत्री पाटील यांनी आमदारांना सांगितले. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी एक कोटीचा निधी पोलीस खात्याकडे देण्यात आला आहे. तो महापालिकेच्या माध्यमातून द्यावा, असा काहींचा प्रयत्न होता, असे मंत्री पाटील यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते. संजय गांधी निराधार योजना समिती, विशेष कार्यकारी अधिकारी यांसह इतर शासकीय कमिट्यांवर कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी बहुतांश आमदारांनी केली. तातडीने कमिट्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिल्याचे समजते. बैठकीला आमदार सुरेश हाळवणकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील उपस्थित होते.