नगराध्यक्षपदावरच सत्तेचा ‘लंबक’ अवलंबून !
By admin | Published: November 5, 2016 12:29 AM2016-11-05T00:29:11+5:302016-11-05T01:00:03+5:30
गडहिंग्लज नगरपालिका : नगराध्यक्षाचा सामना तिरंगी होण्याची शक्यता
राम मगदूम -- गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत बहुमत कुणाचे होणार हे नगराध्यक्षपदाच्या निकालावरच अवलंबून आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या ‘सामन्या’कडेच शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. ‘सत्तेचा लंबक’ अवलंबून असणारा हा सामना तिरंगी होईल, असेच आजचे चित्र आहे. मात्र, प्रत्यक्ष लढतीसाठी माघारीची वाट पहावी लागणार आहे.
सत्ताधारी जनता दलाने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारही सुरू केला आहे. राष्ट्रवादीतून आलेल्या वसंत यमगेकरांना भाजपने उमेदवारी दिली तर भाजपमधून आलेल्या रमेश रिंगणेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. याशिवाय काँगे्रसतर्फे सागर हिरेमठ, शिवसेनेतर्फे प्रा. सुनील शिंत्रे तर ‘स्वाभिमानी’कडून अॅड. राजेंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण ९ अर्ज दाखल झाले असले तरी हा सामना ‘तिरंगी’च होईल असे प्राथमिक चित्र आहे.
गेल्या चार दशकातील तीन निवडणुकांचा अपवाद वगळता पालिकेवर जनता आघाडीचीच सत्ता राहिली आहे. अपवादाने सत्तांतर घडले त्यावेळच्या अनुक्रमे राजर्षी शाहू आघाडी व महालक्ष्मी आघाडीचे नेतृत्व दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्याकडे होते. गतवेळच्या राष्ट्रवादी-शहापूरकर गट आघाडीचे नेतृत्व कुपेकर व मुश्रीफ यांनी केले. त्यामुळे जनता दलापाठोपाठ राष्ट्रवादीचा शहरात प्रभाव आहे. जनता दल व राष्ट्रवादीच्या प्रभावाला छेद देण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील संभाव्य महाआघाडीत शिवेसना व स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होण्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्यातील जागा वाटपासंदर्भात अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे ही आघाडी अद्याप चर्चेतच अडकली आहे.
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना गडहिंग्लज शहरात मिळालेली लक्षणीय मते विचारात घेवून नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्याला मिळावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांनी ही मागणी नेटाने लावून धरल्यास फेरबदल होवू शकतो. मात्र, रिंगणेसारखा कार्यकर्ता गमावल्यानंतर यमगेकरांना बाजूला करून भाजप धोका पत्करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच नगराध्यक्षपदाचा सामना तिरंगीच होईल असे स्पष्टपणे दिसत आहे. यात बाजी मारणाऱ्यांचेच यावेळी पालिकेत बहुमत राहील, असे जाणकारांचे मत आहे.
१९७४ ची थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक काँगे्रसचे डॉ. एस. एस. घाळी व विरोधी आघाडीचे आप्पासाहेब नलवडे यांच्यात झाली. त्यात मोठ्या मताधिक्क्याने घाळी विजयी झाले. मात्र, २१ पैकी विरोधी आघाडीला १४ तर सत्ताधाऱ्यांना ७ जागा मिळाल्या होत्या.
२००१ ची थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादीच्या निरूपमा बन्ने व जनता दलाच्या चंद्रकला पाटणे यांच्यात झाली. त्यात बन्ने विजयी झाल्या. त्यावेळी विरोधी राष्ट्रवादी, काँगे्रस, शिवसेना व भाजप युतीच्या महालक्ष्मी आघाडीला १७ तर सत्ताधारी जनता आघाडीला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या.