बेदखल कोठड्या बनताहेत पोलिसांची डोकेदुखी

By admin | Published: January 30, 2017 12:55 AM2017-01-30T00:55:47+5:302017-01-30T00:55:47+5:30

पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष : कोठडी अद्ययावत हव्या; जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालणे गरजेचे

The headache of the police is getting ejected | बेदखल कोठड्या बनताहेत पोलिसांची डोकेदुखी

बेदखल कोठड्या बनताहेत पोलिसांची डोकेदुखी

Next


एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूर
जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतील कोठडींची दुरवस्था झाली आहे. अस्वच्छ परिसर, उंदीर-घुशींचा वावर, डासांचा प्रादुर्भाव अशा बिकट परिस्थितीत आरोपींना ठेवावे लागत आहे. आरोपींच्या जीवितास धोका पोहोचला, तर पोलिसांच्या नोकरीवर पाणी फिरलेच म्हणून समजा. शिवाय वेळप्रसंगी शिक्षाही भोगावी लागते. या बेदखल कोठड्या पोलिसांची डोकेदुखी बनल्या आहेत. पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी पोलिस ठाण्यातील कोठड्यांची पाहणी करून त्या अद्ययावत व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्यांत गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना ठेवण्यासाठी स्वतंत्र १०+१२ किंवा १२+२० रुंदी-लांबीची कोठडी आहे. या कोठडीमध्ये रात्री-अपरात्री आरोपींना लघुशंकेसाठी छोटेसे स्वच्छतागृह आहे. त्याशिवाय ती खोली पूर्णत: मोकळी असते. कोणतीही वस्तू, फॅन यांची सुविधा नसते. कोठडीसमोर चोवीस तास सुरक्षारक्षक तैनात केलेला असतो. त्याला कोठडीतील आरोपींच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. शहरात करवीर, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी पोलिस ठाण्यांमध्ये आरोपींना ठेवण्यासाठी स्वतंत्र कोठडी आहे. राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये १०+१० ची छोटीशी कोठडी आहे. तर लक्ष्मीपुरीमध्ये १०+१२ ची कोठडी आहे. करवीर आणि राजारामपुरीच्या कोठड्या मोठ्या आहेत. या सर्व कोठडींची दुरवस्था झालेली दिसून येते. आरोपींनी केलेल्या लघुशंकेची दुर्गंधी, झाडलोट नसल्याने उंदीर-घुशींचा वावर आहे. या कोठड्यांमध्ये आरोपींचा जीव कोंडला जात आहे.
पोलिस ठाण्यांच्या कोठडीमध्ये आरोपींच्या जिवाला धोका पोहोचेल, अशी कोणतीही वस्तू न ठेवण्याचे आदेश आहेत. जिल्ह्णांतील बहुतांश पोलिस ठाण्यांच्या कोठडीमध्ये घोंगडे, चादर, बेडशीट पडलेली दिसून येते. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्येच अरुण पांडव या आरोपीचा मृत्यू झाला. वादग्रस्त वडगाव पोलिस ठाण्यामध्ये चार वर्षांपूर्वी तिघा आरोपींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. जगदीश उर्फ सनी प्रकाश पोवार या तरुणाचा कोठडीतील मृत्यू. या घटनांच्या धगीमध्ये अधिकाऱ्यांसह पोलिस होरपळून गेले. याची पुनरावृत्ती पुन्हा घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे.
आरोपींना घरगुती जेवण
पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींना पोलिसांकडून दोन चपाती व भाजी दिली जात होती. गृहविभागाने जेवणासाठी दिले जाणारे अनुदान बंद केल्याने सध्या आरोपींना घरचे जेवण दिले जात आहे. हे जेवण पोलिसांना नेहमी तपासून द्यावे लागते. कौटुंबिक वादातील आरोपींना त्यांच्या जिवाला धोका पोहोचू नये, म्हणून पोलिस स्वत:चे पैसे खर्च करून जेवण देतात. पोलिस प्रशासनाने सरकारी जेवण पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्याही स्तरावर प्रयत्न केलेले दिसत नाहीत. त्याचा त्रास मात्र पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

Web Title: The headache of the police is getting ejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.