बरे झाले, कोरोना रुग्ण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:29 AM2021-07-14T04:29:53+5:302021-07-14T04:29:53+5:30
कोल्हापूर: पावसाच्या पुनरागमनाच्या जोडीने मंगळवारी कोरोनाच्या ओहोटीची सुखद वार्ता कानी पडली. नव्या कोरोनाबाधितांची संख्या सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ...
कोल्हापूर: पावसाच्या पुनरागमनाच्या जोडीने मंगळवारी कोरोनाच्या ओहोटीची सुखद वार्ता कानी पडली. नव्या कोरोनाबाधितांची संख्या सोमवारच्या तुलनेत मंगळवारी एकाच दिवसात तब्बल ९६४ ने कमी झाली. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातही बाधितांचे आकडे बरेच कमी झाले आहेत. रुग्णसंख्या घटत असताना बरे होणाऱ्यांचे प्रमाणही तब्बल १७५१वर गेले आहे.
कोरोनाचे आकडे दररोज वर-खाली होत आहेत. गेल्या चार दिवसात सातत्याने दीड हजारावर रोजचा आकडा होता. सोमवारी तर एकदम १९९९ वर आकडा गेल्याने सर्वांच्याच काळजात धस्स झाले होते. प्रशासनाने देखील लगेच निर्बंध कडक करत सरसकट व्यापारास परवानगी नाकारली होती. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची भीती वाढू लागली होती; मात्र मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या अहवालानंतर मात्र सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू अजूनही कोल्हापुरातच जास्त असलेतरी मंगळवारी त्याची संख्या गेल्या दोन महिन्यातील नीचांकावर आली. शहरात ३०२ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू झाला. यात कसबा बावड्यातील एका २२ वर्षीय तरुणीच्या मृत्यूचा समावेश आहे. उर्वरित जिल्ह्याचा विचार करता अजूनही करवीर, हातकणंगलेत रुग्णसंख्या जास्त असून मृत्यू हे करवीरमध्ये ३ तर हातकणंगलेत ४ आहेत. पन्हाळा, भुदरगडमध्ये प्रत्येकी दोन मृत्यू आहेत. आजरा, राधानगरी, शिरोळ, गगनबावड्यात एकही मृत्यू नाही. उर्वरित तालुक्यात प्रत्येकी एक मृत्यू आहे.
आज झालेले मृत्यू
कोल्हापूर शहर: ०७ कसबा बावडा, सुभाषनगर, राजाराम रोड, शिवाजी पेठ, सदर बाजार, टाकाळा, पाटील कॉलनी सुभाषनगर
करवीर: ०३ निगवे, नागाव, उचगाव,
पन्हाळा: ०२ वारणा कोडोली, कोडोली,
हातकणंगले:०४ पुलाची शिरोली, इचलकरंजी, कबनूर, चोकाक,
भुदरगड: ०२ गारगोटी, मिणचे खुर्द,
कागल: ०१ बोळावीवाडी ,
गडहिंग्लज: ०१ भडगाव,
चंदगड: ०१ कागणी,
शाहूवाडी: ०१ चरण,
इतर जिल्हा: ०२ मत्तीवडे (ता. चिक्कोडी), शिरगाव (ता. वाळवा)