डंपरच्या धडकेत आरोग्य सहाय्यक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:23 AM2021-02-13T04:23:24+5:302021-02-13T04:23:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : भरधाव डंपरने धडक दिल्याने नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक राजेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोळ : भरधाव डंपरने धडक दिल्याने नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक राजेश शिवाप्पा द्राक्षे (वय ५०, रा. वृंदावन हौसिंग सोसायटी, पहिली गल्ली, जयसिंगपूर) हे जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शिरोळ - जयसिंगपूर मार्गावरील हॉटेल पवारसमोर घडला. याप्रकरणी डंपरचालक धोंडाप्पा निलाप्पा माळी (रा. माडग्याळ, ता. जत, जि. सांगली) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदणी नाक्याकडून शिरोळ केपीटीकडे डंपर भरधाव निघाला असता, हॉटेल पवारसमोर दुचाकीवरील राजेश द्राक्षे यांना डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकीसह द्राक्षे हे रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. द्राक्षे हे नृसिंहवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी हेरले येथेही आरोग्य सहाय्यक म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
फोटो - १२०२२०२१-जेएवाय-०१-राजेश द्राक्षे