आरोग्य यंत्रणाच मृत्युशय्येवर...!
By Admin | Published: November 21, 2014 11:41 PM2014-11-21T23:41:17+5:302014-11-22T00:07:34+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र : ४४ जागा रिक्त; तीन तालुके अधिकाऱ्यांविना
भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -जिल्ह्यातील ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ४४ आरोग्य अधिकारी (डॉक्टर) यांच्या जागा रिक्त आहेत. तीन तालुका आरोग्याधिकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच मृत्युशय्येवर असल्याचे पहायला मिळत आहे. आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्यामुळे खेड्यातील रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. परिणामी सर्वाधिक फटका गरीब, सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. आरोग्य केंदे्र आहेत, मात्र डॉक्टर नाहीत, असे चित्र आहे. रुग्णांना ‘डॉक्टर देता का डॉक्टर?...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
ग्रामीण जनतेला आरोग्याची सेवा मिळावी, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. सर्वसाधारणपणे ३० हजार लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाच हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र असे प्रमाण आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा मंजूर आहेत. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारीच कार्यक्षेत्रातील उपकेंद्रात रुग्णांना सेवा देत असतात. परंतु, जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांत पुरसे डॉक्टर नसल्यामुळे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ७३ प्राथमिक आरोग्य केंदे्र आहेत. त्यांमध्ये १२३ आरोग्याधिकारी कार्यरत आहेत. ४४ पदे रिक्त आहेत. त्यांना रिक्त असलेल्या पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अतिरिक्त कार्यभार असलेले डॉक्टर रजेवर असल्यास संंबंधित आरोग्य केंद्रातील सेवाच ठप्प होत आहे. लोकसहभागातून आरोग्य केंद्रांचे सुशोभीकरण केले जात आहे. मात्र, डॉक्टरभरतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्याकडून डॉक्टरांच्या रिक्त जागेवर चर्चा होते. मात्र, भरावयाच्या रिक्त जागेसंबंधी आमदार, खासदार यांच्याकडून शासकीय स्तरावर ठोस पाठपुरावा होत नाही. दहा हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांतही डॉक्टर नाहीत.
कित्येक आरोग्य केंद्रात केवळ एकच डॉक्टर
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर पदानुसार दोन डॉक्टर असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक तालुक्यातील कित्येक केंद्रांत एकच डॉक्टर आहे. त्याबाबतची माहिती अशी : वाटंगी, उत्तूर (ता. आजरा); हसूर (करवीर), कसबा सांगाव, चिखली, सिद्धनेर्ली, पिंपळगाव, कापशी (कागल); कानडेवाडी, हलकर्णी, मुुंगूरवाडी, महागाव (गडहिंग्लज); कोतोली, बोरपाडळे, बाजारभोगाव (पन्हाळा); परळे निनाई, करंजफेण, शित्तूर, आंबा, मांजरे, बांबवडे (शाहूवाडी); कानूर, हेरे, अडकूर (चंदगड); अब्दुललाट, नृसिंहवाडी (शिरोळ); कडगाव, पाटगाव, पिंपळगाव, मडिलगे (भुदरगड); राशिवडे, ठिकपुर्ली, धामोड, सरवडे, पथक तुरंबे (राधानगरी); निवडे (गगनबावडा).
रिक्त डॉक्टरांची पदे भरण्यासंबंधी वेळोवेळी झालेल्या बैठकांत वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे. पाठपुरावाही केला जात आहे. शासकीय स्तरावरील हा विषय आहे.
- डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद