यंदा ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’, पालखी सोहळ्यात कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे पथक तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 03:51 PM2024-06-20T15:51:49+5:302024-06-20T15:54:16+5:30
चार जिल्ह्यांतून निघणार वारी
दीपक जाधव
कोल्हापूर : आषाढीवारीनिमित्त निघणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या व पालखी सोहळ्यात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाने पुढाकार घेतला असून कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतून जाणाऱ्या दिंडी व पालखी सोहळ्यात आरोग्य पथक तैनात असेल. या पथकाद्वारे वारकऱ्यांना तपासणीसह उपचार पुरविण्यात येणार आहेत.
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतून साधारणपणे साठ ते सत्तर छोट्या मोठ्या पायी दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात. त्यांना आरोग्य सुविधा पुरव ण्यासाठी चार जिल्ह्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी याच्या मार्गदर्शनाखाली चारशेहून अधिक कर्मचारी या आरोग्य वारीत सहभागी होऊन वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देणार आहेत.
वारीमध्ये दुचाकीवरून ३५ आरोग्यदूत फिरते राहणार असून वारीमध्ये चालत असताना वारकऱ्यांना काही अडचणी येऊ नयेत म्हणून हे आरोग्यदूत लक्ष ठेवतील. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तेथील आरोग्य संस्थेतील २६ रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत. या आरोग्यवारीच्या माध्यमातून दिंडी सोहळ्यात सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती ही करण्यात येणार आहे.
पाण्याची तपासणी..
दिंडीतील वारकऱ्यांसाठी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही टँकरच्या माध्यमातून केली जाते. या पाण्याची तपासणी ठिकठिकाणी आरोग्य विभागामार्फत होणार आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून यावर्षी प्रथमच आरोग्य विभागामार्फत ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आरोग्य विभागाला मिळणार आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही अडचण वारकऱ्यांना येऊ देणार नाही. - डाॅ. दिलीप माने आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर.
असे असतील आरोग्य कर्मचारी
- तज्ञ डाॅक्टर-०२
- वैद्यकीय अधिकारी -८६
- आरोग्य अधिकारी -६६
- आरोग्य निरीक्षक-२६
- अधिपरिचारिका - १५
- आरोग्य सेविका ५१
- आरोग्य सेवक -७६
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ-०५
- औषध निर्माण अधिकारी ४२
- वर्ग चारचे कर्मचारी १०
- वाहन चालक- १३
अशी असेल आरोग्य सुविधा
- चार जिल्ह्यांतून ४२ पथके.
- प्रत्येक ५ किलोमीटरवर एक पथक.
- आरोग्यदूत ३५