निरोगी वार्धक्य-१

By admin | Published: April 13, 2016 11:55 PM2016-04-13T23:55:26+5:302016-04-13T23:55:51+5:30

सिटी टॉक

Healthy agrarian-1 | निरोगी वार्धक्य-१

निरोगी वार्धक्य-१

Next

वय झालं असं कधी म्हणायचं बरं? आणि वय वाढतं म्हणजे नक्की काय होतं? वय वाढणं हा काही रोग नाही, तर ती नैसर्गिक क्रिया आहे. जी आपल्या जन्मापासून चालू होते आणि मृत्यूबरोबर संपते. लहानमोठ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये ही क्रिया अविरत सुरू असते. मात्र प्रत्येकाचा वय वाढण्याचा वेग कमी अधिक असू शकतो. म्हणजे काय? तुम्ही पाहिलं असेल काही लोक तिशीनंतरच म्हातारे दिसू लागतात. त्वचा सुरकुतलेली, कामाचा वेग उत्साह उतरलेला, सतत थकलेलं शरीर आणि काही ना काही व्याधी जडलेल्या. याउलट काही व्यक्तींच्या वयाचा अंदाजच बांधता येत नाही. साठी-सत्तरी ओलांडली तरी तजेलदार चेहरा, निरोगी शरीर, चैतन्याने परिपूर्ण मन. आता लक्षात येतंय मला काय म्हणायचंय ते? आपण म्हातारपणाकडे झुकत असतो. कारण आपल्या शरीराची झीज होत असते. ही झीज काही व्यक्तींमध्ये जलद होते, तर काही व्यक्तींमध्ये सावकाश. झीज होण्याचा वेग ठरविण्यास दोन घटक कारणीभूत असतात. त्यापैकी पहिला घटक आपली गुणसूत्रे व दुसरा घटक म्हणजे आपला आहार. यापैकी गुणसूत्रांची कार्यप्रणाली अनुवंशिकतेने ठरवली जाते. ज्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही पण आपला आहार मात्र आपण नियंत्रित करू शकतो. सर्वसाधारणपणे वयाच्या साठीनंतरचा काळ हा वार्धक्यकाळ समजला जातो. भारताच्या २०११ च्या लोकसंख्येनुसार आठ टक्के लोक हे वयाच्या साठ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील आहेत.
जसजसे वार्धक्य जवळ येत जाते, तसतसे घराबाहेर पडून खाद्यपदार्थ विकत घेण्याची क्षमता, स्वयंपाक करण्यासाठी लागणारी शक्ती कमी होऊ लागते. शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे दातांच्या समस्या सुरू झाल्याने आहार कमी होतो व पचनशक्तीही मंदावते, थकवा येणे, भूक कमी होणे, वजनातील उतारचढाव, धाप लागणे, चक्कर येणे, अशा समस्या वार्धक्यात सर्रास जाणवतात. या कमी करण्यासाठी आहारात काही बदल करणे आवश्यक आहे.
म्हातारपणी आपली वाढ थांबलेली असते व तरुणपणापेक्षा हालचालीही कमी झालेल्या असतात, त्यामुळे कमी उष्मांकयुक्त आहार घ्यावा. वय वाढेल तशी स्रायूंची घनता कमी होत जाते व नवीन प्रथिनांच्या निर्मितीसाठी शरीर सक्षम राहत नाही. म्हणूनच दूध, दही अंडी, डाळी अशा प्रथिनयुक्त पदार्थांचा रोजच्या जेवणात समावेश असावा. प्रथिनांची कमतरता झाल्यास सूज येणे, रक्तक्षय, प्रतिकारशक्ती कमी होऊन जंतूसंसर्ग होणे अशी लक्षणे दिसू लागतात. आहारातील स्रिग्ध पदार्थांची निवड डोळसपणे करावी. तळलेले पदार्थ, मिठाया, मटण, पामतेल या गोष्टींच्या अतिसेवनाने हृदयविकाराचा धोका संभवतो. त्यापेक्षा बदाम, अक्रोड, साय काढलेले दूध, तूप, जवस, करडई अशा पदार्थांच्या मर्यादित सेवनाने शरीरातील चांगले फॅट्स वाढतात. ज्यामुळे दृष्टिदोष, केस गळणे, सांधेदुखी, नैराश्य या विकारापासून संरक्षण मिळते.
म्हातारपणामध्ये हाडांची झीज अधिक प्रमाणात होऊ लागते. त्यामुळे कॅल्शिअमची गरज वाढते. स्त्रियांमध्ये ही गरज पुरुषांपेक्षा जास्त असते. कारण रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी होते व शरीर कॅल्शिअमच्या शोषणात अडथळे येतात. दूध व दुधाचे पदार्थ हे कॅल्शिअमचे सर्वांत मोठे स्रोत आहेत. तसेच हिरव्या पालेभाज्या, नाचणी, सोयाबीन यामधूनही ते मिळवता येते. म्हातारपणी काही लोकांना चवींची संवेदना कमी होणे, भूक न लागणे, जखमा लवकर न भरून येणे या समस्या जाणवतात. ही झिंक या खनिजाची कमतरता असण्याची लक्षणे आहेत. मासे, चिकन, कडधान्ये, सुका मेवा यातून शिरीराला झिंकचा पुरवठा होतो. इतर वयोगटाप्रमाणे या वयातही पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर पडण्यासाठी व मुत्रपिंडांचे कार्य सुरळीतपणे होण्यासाठी दीड ते दोन लिटर पाणी प्यायला पाहिजे. जरी तहान लागली नाही तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत रहावे. वयोमानपरत्वे आहाराच्या स्वरुपामध्ये कसे बदल करावेत, याबाबत बोलू पुढच्या लेखात.--
डॉ. शिल्पा जाधव

Web Title: Healthy agrarian-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.