निरोगी जनावरांसाठी सकस चारा महत्त्वाचा

By admin | Published: January 19, 2016 12:29 AM2016-01-19T00:29:02+5:302016-01-19T00:35:26+5:30

पश्चिम महाराष्ट्रात शेती व्यवसाय महत्त्वाचा आहे.

Healthy fodder for healthy animals is important | निरोगी जनावरांसाठी सकस चारा महत्त्वाचा

निरोगी जनावरांसाठी सकस चारा महत्त्वाचा

Next

भरत शास्त्री - बाहुबली
पश्चिम महाराष्ट्रात शेती व्यवसाय महत्त्वाचा आहे. त्यासोबत दुग्ध व्यवसाय देखील या भागतील शेतकरी प्रामुख्याने करीत आहेत. शेतीवर आधारित व एकमेकांना पूरक असल्याने शेतकऱ्यांकडे घरोघरी कमी अधिक प्रमाणात पशुधन आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायामध्ये कित्येक कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या खण्यापिण्यापासून ते गोठा व आरोग्याविषयी शास्त्रशुद्ध पद्धत माहीत नसल्याने जनावरे अनेक आजारांना बळी पडत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चारा हा महत्त्वाचा घटक आहे.
जनावरांमध्ये पोटाचे विकार अधिक प्रमाणात आढळतात. यामध्ये पोटफुगी, पोट गच्च होणे व अपचन असे नेहमी होणारे विकार आहेत. हे विकार प्रामुख्याने चाऱ्यातील बदलांमुळे होतात, असे विकार वेळीच लक्षात आल्यास त्यावर योग्य उपचाराने मात करता येते.
जनावरांच्या पोटाची अंतर्गत रचना अतिशय गुंतागुंतीची असते. त्यामुळे पोटाचे विकार अधिक प्रमाणात दिसून येतात. विशेष करून रवंथ करणारी जनावरे समोर मिळेल तेवढा चारा खातात व नंतर निवांतपणे रवंथ करतात. जनावरे फिरायला सोडल्यावर कचऱ्याच्या ढिगावर,उकिरड्यावर मिळेल त्या गोष्टी खातात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण ही बाब अतिशय गंभीर आहे. कोणता चारा खाल्ला पाहिजे, कोणता खाऊ नये याची जाण जनावरांना नसल्याने नकळत त्यांच्या पोटात न पचणाऱ्या वस्तू जातात. त्यामध्ये बऱ्याचदा प्लास्टिकच्या पिशव्या, कापड, रबरचे तुकडे, चप्पलचे भाग, माती व वाळू यांसारख्या वस्तू पोटात जातात.
चुकीच्या वस्तू पोटात गेल्याने त्यांच्या पचन क्रियेवर दीर्घकाळ परिणाम होतो. त्यामुळे जनावर दूध कमी देते, चारा कमी खाते, तसेच जनावरांच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. कधी कधी चाऱ्यामधून जनावरांच्या पोटात टाचणी, सुई, तार, आदी धारदार वस्तूदेखील जातात. त्यामुळे हृदय, फुफ्फुस व पोटाच्या पडद्यांना जीवघेण्या इजा होतात. कितीही महागडे उपचार केले तरी त्यांचा फायदा होत नाही. याउलट शेळ्या, मेंढ्या निवढक चारा खातात. त्यामुळे त्यांच्या पोटात न पचणाऱ्या वस्तू जाण्याचे
प्रमाण अतिशय नगण्यच असते. तथापि, काळजी घेणे हिताचे असते.


जनावरांची काळजी कशी घ्यावी
जनावर चरण्यासाठी सोडले असल्यास अनावश्यक काही खाणार नाहीत याकडे लक्ष असावे.
जनावरांना वस्त्यांमध्ये भटकू देऊ नये.
दुधाळ जनावरांच्या खुराकात नियमित क्षार मिश्रणे मिसळावीत. ४. जनावरांचा चारा कापताना कटरमध्ये वायरचे किंवा तारांचे तुकडे जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ५. जनावरास नेहमी जंतनाशक औषधे द्यावीत.
जनावरास पाणी देताना डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यात थोडे मीठ टाकावे.


न पचणाऱ्या वस्तू का जातात?
शरीरात आवश्यक क्षार व खनिजांची कमतरता असल्यास वासरे व मोठी जनावरे माती खातात किंवा गोठ्यातील भिंती चाटतात.
जनावरास दीर्घकाळ उपाशी ठेवल्यामुळे दिसेल तो चारा खातात.
जमिनीवरून चारा गोळा करून टाकला जातो. तेव्हा त्यासोबत खिळ्यासारख्या वस्तू पोटात जातात.
उकिरड्यांवरील कचरा खाताना बऱ्याचदा प्लास्टिक पोटात जाते.

Web Title: Healthy fodder for healthy animals is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.