पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी २० जुनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 01:34 PM2019-04-20T13:34:07+5:302019-04-20T13:37:42+5:30
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी शनिवारी होणारी सुनावणी दि. २० जुनला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश डी. व्ही. शेळके यांच्या न्यायालयात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी शनिवारी होणारी सुनावणी दि. २० जुनला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश डी. व्ही. शेळके यांच्या न्यायालयात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे.
त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आलेची माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. सुनावणीसाठी संशयित आरोपी समीर गायकवाड, त्याचे वकील समीर पटवर्धन न्यायालयात हजर होते. सुनावणी लांबणीवर पडल्याने ते माघारी सांगली येथे निघून गेले.
पानसरे हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. कोल्हापूर एसआयटी, कर्नाटक एसआयटी आणि सीबीआय असा तिघांचा तपास अंतिम टप्प्यात आहे. संशयीत आरोपींच्या वकीलांनी पानसरे हत्येप्रकरणी काही संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे हा खटला चालविण्यात यावा, अशी अपील उच्च न्यायालयात केली होती. परंतु तपास अधिकारी तिरुपती काकडे यांनी पानसरे हत्येप्रकरणी तपास सुरु आहे.
फरार मारेकरी संशयित विनय बाबूराव पवार (वय ४०, रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा), सारंग दिलीप अकोळकर ऊर्फ कुलकर्णी (३८, रा. डी. एस. के. चिंतामणी अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे) यांचा शोध सुरु आहे. आणखी काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे हा खटला लगेच सुरु करु नये, तपासाला आणखी काही दिवस अवधी द्यावा, अशी विनंती केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने पानसरे हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे. शनिवारी सुनावणीला विशेष सरकारी वकील राणे, व संशयित आरोपी गायकवाड आणि त्याचे वकील पटवर्धन उपस्थित होते. न्यायाधिश शेळके यांनी उच्च न्यायालयाचे निर्देश समोर ठेऊन ही सुनावणी २० जुनला घेण्यात येईल असे स्पष्ट केले.
‘त्या’ दोघांचा सुगावा नाही....
पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील फरार मारेकरी संशयित विनय पवार व सारंग अकोळकर यांची माहिती देणाऱ्यास राज्य शासनाने ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तपास यंत्रणेला अद्यापही या दोघांचा सुगावा लागलेला नाही. मडगाव-गोवा बॉम्बस्फोटापासून हे दोघे फरार आहेत. ते जिवंत आहेत का? याचीच शंका अनेकांना आहे.