‘गोकुळ’ दुबार ठरावांवर २ मार्चपासून सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:28 AM2021-02-17T04:28:54+5:302021-02-17T04:28:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप यादीत आलेल्या दुबार ठरावांवर २ व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप यादीत आलेल्या दुबार ठरावांवर २ व ३ मार्चला सुनावणी घेतली जाणार आहे. इतर हरकतींवर ४ मार्चला सुनावणी घेतली जाणार आहे.
‘गोकुळ’ची प्रारूप यादी सोमवारी (दि. १५) प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये ३५ दुबार ठराव आहेत. त्यावर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. करवीर, कागल, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील दुबार ठरावांवर २ मार्च, तर आजरा, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड व राधानगरी तालुक्यातील दुबार ठरावांवर ३ मार्चला सुनावणी होणार आहे. त्याशिवाय प्रारूप यादीवर आलेल्या इतर हरकतींवर ४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
प्रारूप यादींवर २४ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. दरम्यान, मंगळवारी आठ हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये पाच हरकती या दाखल ठरावधारक मृत असल्याबाबत आहेत. दत्त-गणेशवाडी, नागनाथ-नागदेववाडी, धनलक्ष्मी-घोसरवाड, दिनबंधू-शेडशाळ, छत्रपती शिवाजी-लिंगनूर दुमाला या पाच संस्थांनी ठरावाव्दारे नेमणूक केलेले प्रतिनिधी मृत झाले आहेत. त्यामुळे येथे नवीन व्यक्ती प्राधिकृत केला आहे. शेळेवाडी (ता. गगनबावडा) येथील जोतिर्लिंग दूध संस्थेचा ठरावधारक हा सभासद नसल्याची तक्रार दाखल केली आहे.