सात संस्थांमध्ये ठरावांबाबत समझोता : ‘गोकुळ’ दुबार ठरावांची सुनावणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:42 PM2020-01-30T12:42:40+5:302020-01-30T12:44:35+5:30
या संस्थेचे दूध जेमतेम १०० लिटर आहे आणि ११ पैकी दहाच संचालक आहेत. विशेष म्हणजे दोन्ही गटांनी पाच-पाच संचालकांना हजर केले. महालक्ष्मी- येणेचवंडी (ता. गडहिंग्लज), संत जनाबाई, सैतवडे (ता. गगनबावडा), महालक्ष्मी, निवडे (ता. गगनबावडा), आदी संस्थांमध्ये ठरावासाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ३५ दुबार ठरावांवरील सुनावणी बुधवारी पूर्ण झाली. यामध्ये सात दूध संस्थांच्या दोन्ही गटांच्या प्रतिनिधींमध्ये कार्यालयातच समझोता होऊन एकाने माघार घेतल्याने पेच सुटला. उर्वरित ठरावधारकांचे म्हणणे साहाय्यक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख यांनी ऐकून घेतले आहे. पात्र ठरावधारकांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.
‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी आलेल्या दुबार ठरावांची मंगळवार (दि. २८)पासून डॉ. गजेंद्र देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली. मंगळवारी १६ ठरावांची, तर बुधवारी १९ ठरावधारकांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली. बुधवारी सकाळपासून आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, गगनबावडा तालुक्यांतील दुबार ठरावधारकांना बोलावले होते. कासारपुतळे (ता. राधानगरी) येथे शिवाजी पाटील व उत्तम चव्हाण यांच्या नावांवर ठराव आहेत. अधिकृत सभेवरून दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला.
या संस्थेचे दूध जेमतेम १०० लिटर आहे आणि ११ पैकी दहाच संचालक आहेत. विशेष म्हणजे दोन्ही गटांनी पाच-पाच संचालकांना हजर केले. महालक्ष्मी- येणेचवंडी (ता. गडहिंग्लज), संत जनाबाई, सैतवडे (ता. गगनबावडा), महालक्ष्मी, निवडे (ता. गगनबावडा), आदी संस्थांमध्ये ठरावासाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले. पांडुरंग, करंजफेण (ता. राधानगरी), सावित्रीबाई फुले, चाळकोबावाडी, आदी संस्थांमध्ये समझोता झाला; तर अंदाज आल्याने काही संस्थांचे प्रतिनिधी उपस्थितच राहिले नाहीत. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यावर डॉ. गजेंद्र देशमुख निर्णय घेणार आहे. त्यानंतर पात्र प्रतिनिधींची नावे प्रारूप यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.
- अवसायनातील संस्थेसाठी झटापट
चौधरवाडी (ता. गगनबावडा) येथील रमाबाई दूध संस्था अवसायनात आहे. कायद्याने या संस्थेचा ठरावच अपात्र ठरणार आहे. मात्र या ठरावासाठी दोन्ही गटांकडून झटापट सुरू होती. दोन प्रोसीडिंग, दोन सचिव उभे केले होते.
- अध्यक्ष, सचिव एकीकडे; संचालक दुसरीकडे!
बहुतांश संस्थांमध्ये अध्यक्ष व सचिवांनी संगनमताने ठराव केल्याचे सुनावणीत पुढे आले. त्यामुळे अध्यक्ष, सचिव एका बाजूला, तर बहुतांश संचालक दुसऱ्या बाजूला, असाच प्रकार झाला आहे.
- सभासदच नाही, मग ठराव कसा?
दत्त, दूध संस्था महागोंडवाडी (ता. आजरा)चा ठराव दत्तात्रय हतकर व लक्ष्मण हतकर असा केला होता. दत्तात्रय हतकर हे सचिव आहेत. त्यावर लक्ष्मण हतकर यांच्या वकिलांनी जोरदार हरकत घेत, दत्तात्रय हतकर हे सभासदच नाहीत; तर त्यांच्या नावावर ठराव करता येतो का? बहुमत कोणाकडे यापेक्षा कायदा काय सांगतो, यावर न्याय देण्याची मागणी लक्ष्मण हतकर यांच्या वकिलांनी केली.