माणगाव ग्रामपंचायतीच्या याचिकेची गुरुवारी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:18 AM2021-07-20T04:18:23+5:302021-07-20T04:18:23+5:30
कोल्हापूर : विद्युत खांब, ट्रॉन्सफॉर्मरचा फाळा भरण्यास नकार देणाऱ्या महावितरण विरोधात माणगाव ग्रामपंचायतीने उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. ...
कोल्हापूर : विद्युत खांब, ट्रॉन्सफॉर्मरचा फाळा भरण्यास नकार देणाऱ्या महावितरण विरोधात माणगाव ग्रामपंचायतीने उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. यावर आता गुरुवारी (दि.२२ जुलैला) सुनावणी होणार आहे.
माणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारे महावितरणचे खांब, ट्रॉन्सफॉर्मर, उपकेंद्राचा फाळा भरण्याची मागणी ग्रामपंचायतीने महावितरणकडे केली होती. याबाबत काढलेल्या नोटिसीला महावितरणने २० डिसेंबर २०१८ च्या शासन आदेशाचा आधार घेऊन उत्तर दिले होते. या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीस फाळा भरणे आवश्यक नसल्याचे लेखी कळविले होते.
मात्र, याला माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी आक्षेप घेतला आहे. २०१८ मध्ये जो शासनाने आदेश काढला आहे तो ऊर्जा विभागाचा आहे. तो आदेश ग्रामविकास विभागाचा नाही. त्यामुळे या शासन आदेशास मगदूम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. एखादा निर्णय मंत्रिमंडळासमोर झाला तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील अधिनियमामध्ये बदल करावा लागतो. तोही बदल झाला नसल्याकारणाने आणि ग्रामविकास विभागाने कोणताही शासन निर्णय दिला नसल्याने ऊर्जा विभागाचा आदेश लागू हाेत नसल्याचा मगदूम यांचा दावा आहे.
चौकट
रस्त्यांवरील दिव्यांच्या बिलाचे १३७० कोटी जमा
महावितरणने १४ व्या वित्त आयोगातून गावागावांतील रस्त्यांवरील दिव्यांच्या बिलापोटी १३७० कोटी रुपये भरून घेतले आहेत. मात्र, हे नेमके कोणत्या गावासाठी किती भरून घेतले याचा गोषवाराही अजून दिलेला नाही. मुळात गावातील सेेवांवर कर आकारणी करण्याचा ग्रामपंचायतीचा अधिकार राज्यघटनेने मान्य केला असताना आणि याबाबत ग्रामविकास विभागाने शासन आदेश काढला नसताना फाळा न भरणे चुकीचे आहे. त्यामुळे ही याचिका दाखल केल्याचे सरपंच मगदूम यांनी सांगितले.