आरक्षण सोडतीवर उद्या सुनावणी
By admin | Published: August 6, 2015 01:10 AM2015-08-06T01:10:33+5:302015-08-06T01:13:06+5:30
न्यायालयात घेतलेली धाव व्यर्थ : आयोगाचे वकील अनुपस्थित
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने सोडत काढण्याच्या निर्णयास आव्हान देत पूर्वी निश्चित केलेली आरक्षणेच कायम ठेवावीत, या मागणीसाठी शिवसेनेने उच्च न्यायालयात घेतलेली धाव बुधवारी व्यर्थ ठरली.
न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल झाली; पण त्यांनी कोणतीही सुनावणी न घेता ही याचिका न्या. अनुप मोता व न्या. अचेलिया यांच्या खंडपीठाकडे वर्ग केली. त्यामुळे याचिकेवर बुधवारी कोणतेही कामकाज झाले नाही. पुढील सुनावणी उद्या, शुक्रवारी होणार आहे.
गेल्या शुक्रवारी (दि. ३१) काढण्यात आलेली आरक्षण सोडत बदलली गेल्यास शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे; तसेच अनेक उमेदवारांवर अन्याय होणार आहे. म्हणूनच यापूर्वी निश्चित केलेली आरक्षणे कायम ठेवावीत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
ही याचिका शिवसेनेचे कार्यकर्ते राहुल बंदोडे व अविनाश कामते यांनी दाखल केली असून, त्यात महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयात महापालिकेचे वकील अभिजित आडगुळे, याचिकाकर्ते बंदोडे यांचे वकील बाळकृष्ण जोशी उपस्थित होते. मात्र निवडणूक आयोगाचे वकील उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)