मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत उद्या सुनावणी, पडळकर समर्थकाची गाडी फोडल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 06:18 PM2023-01-10T18:18:17+5:302023-01-10T18:51:13+5:30
तहसीलदारांनी वादग्रस्त जागेत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत
मिरज : मिरजेत ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह जमावाने दुकाने पाडल्याप्रकरणी जागेच्या वादाबाबत मिरज तहसीलदारांसमोर सुनावणी दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. वादग्रस्त जागेत कोणत्याही बांधकामास तहसीलदारांनी मज्जाव केला. दरम्यान, पडळकर समर्थकाची गाडी फोडल्याप्रकरणी गांधी चौक पोलिसांत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
भाजप आ. गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेत बसस्थानकाजवळ वादग्रस्त जागेचा कब्जा घेण्यासाठी सुमारे दीडशे जणांचा जमाव सोबत घेऊन शनिवारी मध्यरात्री चार पोकलॅन लावून दहा दुकाने पाडून एक कोटी रुपयांचे नुकसान केले. याबाबत पडळकर यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या वादग्रस्त जागेबाबत मिरजेचे तहसीलदार दगडू कुंभार यांनी कलम १४५ अन्वये जैसे थे परिस्थिती ठेवून वादग्रस्त जागेत दोन्ही गटांनी काहीही करू नये, असा आदेश दिला आहे. याबाबत सोमवारी तहसीलदार दगडू कुंभार यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
मिळकतधारकांनी संबंधित जागेवर कब्जा असल्याची कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली. यावर तहसीलदार दगडू कुंभार यांनी बुधवारपर्यंत दोन दिवसांनी सुनावणी निश्चित केली.
यावेळी ब्रह्मानंद पडळकर गटाचे वकील अनुपस्थित होते. पाडलेली दुकाने पुन्हा बांधण्याची मिळकतधारकांनी परवानगी मागितली. मात्र, तहसीलदारांनी बांधकामास परवानगी नाकारून वादग्रस्त जागेत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले. मिळकतदारांतर्फे ॲड. नितीन माने, ॲड. ए. ए. काझी यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
दरम्यान, वादग्रस्त जागेतील दुकाने पाडताना गाडी फोडल्याप्रकरणी गांधी चाैक पोलिसात बिरा बजभीम शिंगाडे (४८, रा. सांगोला) या पडळकर समर्थकाने फिर्याद दिली आहे. चिंचणी मायाक्का येथून देवदर्शन घेऊन परत येत असताना शनिवारी मध्यरात्री पावणेतीन वाजता मिरजेत अमर थिएटरसमोर आल्यानंतर शकिल, शब्बीर शेख, शाहिद पिरजादे व त्यांच्या पाच साथीदारांचे आपापसांत भांडण सुरू होते.
यावेळी गाडी बाजूला घेत असताना त्यांनी गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या व शिंगाडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व हत्याराने वार करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पडळकर गटानेही मिळकतधारकांवर गुन्हा दाखल केल्याने याबाबत आता पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.