भूलतज्ज्ञाअभावी ‘सीपीआर’मधील हृदयशस्त्रक्रिया रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:23 AM2021-01-08T05:23:40+5:302021-01-08T05:23:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर जिल्ह्यात हृदययशस्त्रक्रियांसाठी प्रसिद्ध असलेल्या सीपीआर रुग्णालयातील या शस्त्रक्रिया ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यात हृदययशस्त्रक्रियांसाठी प्रसिद्ध असलेल्या सीपीआर रुग्णालयातील या शस्त्रक्रिया केवळ भूलतज्ज्ञ उपलब्ध होत नसल्यामुळे गेले काही महिने थांबल्या आहेत. अधिष्ठाता कार्यालयाकडे याबाबतची वस्तुस्थिती मांडूनही भूलतज्ज्ञाची व्यवस्था होत नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्ण चौकशी करून दमले आहेत. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीच आता या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.
राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेला हा सीपीआरमधील हृदयशस्त्रक्रिया विभाग कोल्हापूर जिल्ह्यात नावाजला आहे. सर्वसामान्यांसाठी तर हा विभाग दिलासा देणारा ठरला आहे. कोरोना काळामध्ये या ठिकाणच्या शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या. मात्र ॲन्जिओप्लास्टी आणि ॲन्जिओग्राफी मात्र नियमितपणे केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर झडप बदलण्याच्या आणि बायपास शस्त्रक्रियांबाबत चौकशी केली असता धक्कादायक माहिती मिळाली आहे. भूलतज्ज्ञ मिळत नसल्याने १० महिन्यांपासून या ठिकाणी हृदयशस्त्रक्रिया करणे बंद झाले आहे. यातील कोरोनाचा काळ जरी सोडा तरीदेखील गेल्या तीन महिन्यांत हा विभाग उघडण्यातच आलेला नाही. बलूनद्वारे आणि शस्त्रक्रियेद्वारे अशा दोन पद्धतीने झडपा बदलल्या जातात.
खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले योजनेमधून बायपास कमी खर्चात होऊ शकते. परंतु झडप बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी ५० ते ६० हजार खर्च येत असल्याने आणि तो या योजनेत बसत नसल्याने सर्वसामान्य रुग्ण सीपीआरकडे चौकशी करण्यासाठी येतात. मात्र अजूनही शस्त्रक्रिया सुरू केलेल्या नाहीत असे या विभागाकडून सांगितले जात आहे. जवळपास याआधी महिन्याला १५ ते २० शस्त्रक्रिया केल्या जात असताना आता या शस्त्रक्रिया बंद झाल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मात्र कुचंबणा होत आहे.
चौकट
१२ भूलतज्ज्ञ आहेत, तरीही....
वैद्यकीय महाविद्यालयाकडे १२ भूलतज्ज्ञ आहेत असे सांगितले जाते. याआधीही एक महिला भूलतज्ज्ञ या ठिकाणी काम करत होत्या. परंतु त्यांनीही त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काम बंद केले आहे. या विभागाच्या प्रमुख डॉ. आरती घोरपडे आणि अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनाही या अडचणी निदर्शनास आणून दिल्या गेल्या. परंतु हृदयशस्त्रक्रिया विभागासाठी भूलतज्ज्ञ देण्यासाठी कुणीही तत्परता दाखवलेली नाही.
चौकट
पदापेक्षा रुग्णसेवा महत्त्वाची
सीपीआरमध्ये पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान यांचा विचार करून काहीजण काम करत आहेत. अडचणीच्या काळात कोण विभागप्रमुख, कोण कुठल्या पदावर यापेक्षा ज्याच्याकडे जे कौशल्य आहे ते वापरून रुग्णांची सेवा करणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या काळात वैद्यकीय महाविद्यालयाने चांगले काम केले आहे.