मने जुळली अन् सत्तरीत अडकले विवाहबंधनात, धुमधडाक्यात झालेल्या या विवाहसोहळ्याची कोल्हापुरात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 02:11 PM2023-02-25T14:11:17+5:302023-02-25T14:11:41+5:30

दु:खाचा पाढा वाचून मन मोकळे करता करता दोन्ही मने जुळली आणि लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला

Hearts match and get stuck in marriage in 70s, discussion of this wedding ceremony in Kolhapur | मने जुळली अन् सत्तरीत अडकले विवाहबंधनात, धुमधडाक्यात झालेल्या या विवाहसोहळ्याची कोल्हापुरात चर्चा

मने जुळली अन् सत्तरीत अडकले विवाहबंधनात, धुमधडाक्यात झालेल्या या विवाहसोहळ्याची कोल्हापुरात चर्चा

googlenewsNext

गणपती कोळी

कुरुंदवाड : वृद्धापकाळात नातेवाईक वाऱ्यावर सोडले की आपल्या आयुष्यातील साथीदार एकमेकांना धीर देत कसेबसे जीवन जगत असतात. मात्र साथीदारालाही दैवाने हिरावून घेतले, तर वृद्धाश्रमाशिवाय पर्याय उरत नाही. घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदु:खी वृद्ध वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृद्धाश्रमचालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धूमधडाक्यात लग्न लावून दिल्याने या विवाहाची चर्चा रंगली आहे.

अनुसया शिंदे (७०, मूळ रा. वाघोली, जि. पुणे) अशी वृद्ध नववधू, तर वराचे बाबूराव पाटील (७५, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) असे नाव आहे. दोघेही दोन वर्षांपासून येथील वृद्धाश्रमात आहेत. शरीराने स्वावलंबी असले तरी मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. दोघांचेही साथीदार देवाघरी गेले आहेत.

त्यामुळे या समदु:खी वृद्धांनी एकमेकांच्या आयुष्यातील दु:खाचा पाढा वाचून मन मोकळे करता करता दोन्ही मने जुळली आणि लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघांचीही तयारी असल्याने व कायदेशीर सल्ला घेऊन गुरुवारी वृद्धाश्रमातच मांडव घालून ग्रामस्थ व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पद्धतीने थाटात लग्न लावून देत वृद्धांची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे या वृद्ध जोडप्यांचा विवाह खूपच चर्चेची गोष्ट ठरली आहे.

मायेचा आधार

या लग्नात जात, धर्म नाही की कुंडली नाही. शरीरसुखाची आस नाही की कोणत्याही संपत्ती, हुंड्याची आशा नाही. उर्वरित आयुष्यात एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन एकमेकांना मायेचा आधार असावा इतकीच माफक अपेक्षा या वृद्ध जोडप्याला आहे.


वृद्धांनी स्वखुशीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी विचारपूर्वक निर्णय घेतल्याने व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांची इच्छा पूर्ण करून सहचरणीबरोबर आनंदी जीवन जगण्यासाठी थाटात लग्न करून दिले. लग्नानंतरही वृद्धाश्रमातच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. - बाबासाहेब पुजारी, वृद्धाश्रम चालक

Web Title: Hearts match and get stuck in marriage in 70s, discussion of this wedding ceremony in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.