अंगाची लाही-लाही करणारा उष्मा,तापमान ४१ डिग्रीवर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 06:36 PM2019-05-20T18:36:35+5:302019-05-20T18:42:19+5:30
कोल्हापूरचे तापमान ४१ डिग्रीवर कायम राहिल्याने सोमवारी दिवसभर उष्म्याने अंगाची लाही-लाही होत होती. मंगळवारपासून जिल्ह्याच्या तापमानात थोडी घसरण होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरचेतापमान ४१ डिग्रीवर कायम राहिल्याने सोमवारी दिवसभर उष्म्याने अंगाची लाही-लाही होत होती. मंगळवारपासून जिल्ह्याच्या तापमानात थोडी घसरण होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.
कोल्हापूरचा पारा एवढा कधीच वाढला नव्हता. या वर्षीच ४० डिग्रीच्या पुढे पारा जात असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. सोमवारी सकाळपासूनच अंग तापण्यास सुरुवात झाली. सकाळी अकरानंतर घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. दुपारी सूर्यनारायण अक्षरश: आग ओकत होता.
रस्त्यावरून जाताना अंगावर येणाऱ्या उन्हाच्या गरम झळा सोसवत नव्हत्या. सायंकाळचे पाच वाजले तरी तापमान ३९ डिग्रीपर्यंत राहिल्याने उन्हाची तिरीप चांगलीच होती. त्यानंतर तापमान हळूहळू कमी होत गेले तरी किमान तापमान २४ डिग्रीवर कायम राहिल्याने वातावरणातील उष्मा कायम होता. मंगळवारी तापमानात किंचित घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे; पण वळीव पावसाची येत्या दोन-तीन दिवसांत तरी शक्यता नसल्याचा अंदाज आहे.
शेतीच्या कामावर परिणाम
जीवघेण्या उष्म्याचा फटका शेतीकामाला बसला आहे. सध्या शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत मग्न आहे; पण दुपारी बारानंतर शिवारात काम करायचे म्हटले की जीव घायकुतीला येत आहे.
वीज गायब... जीव कासावीस
सोमवार असल्याने सकाळपासूनच कोल्हापूर शहरात विजेचा लपंडाव सुरू होता. अर्धा, एक तास वीज गायब झाल्याने कार्यालये, घरातील पंखे, ए. सी. बंद पडले होते. त्यामुळे या कालावधीत घरात अथवा कार्यालयात बसताना जीव कासावीस होत होता.