गगनबावड्यात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:17 AM2021-07-11T04:17:13+5:302021-07-11T04:17:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केली आहे; मात्र त्याला अपेक्षित ताकद लागत नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केली आहे; मात्र त्याला अपेक्षित ताकद लागत नाही. पडेल तिथेच जोरदार कोसळत असून उर्वरित ठिकाणी उघडझाप राहिली. गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस असून ३०.४ मिलीमीटर पाऊस झाला. शाहूवाडी तालुक्यात तुलनेत पाऊस कमी आहे.
दहा-बारा दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शुक्रवार पासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. शुक्रवारी दिवसभरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. दुपारी कोल्हापूर शहरासह काही तालुक्यात चांगला पाऊस झाला. सुमारे अर्धा तास एकसारखा पाऊस राहिल्याने पाणीच पाणी केले.
या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असून डोंगरमाथा व माळरानावरील पिकांना एक प्रकारचे जीवदान मिळाले आहे. धरणक्षेत्रातही कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे. कासारी, कुंभी, पाटगाव व कोदे या धरणक्षेत्रात जोरदार पाऊस काेसळत आहे.
शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस मिली मीटरमध्ये असा-
हातकणंगले- ८.३, शिरोळ -११.७, पन्हाळा -४.२, शाहूवाडी - १, राधानगरी - ३.१, गगनबावडा -३०.४, करवीर - ७.१, कागल- ७.१, गडहिंग्लज - ६.८, भुदरगड - ७.६, आजरा - ३.५, चंदगड - ४.२.
रोप लागणींना जोरदार पावसाची प्रतीक्षा
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात भात व नागलीच्या रोप लागणी मोठ्या प्रमाणात केल्या जातात. पावसाने सुरुवात केली असली तरी शिवारात अद्याप पाणी उभा राहिलेले नाही. त्यामुळे चिखल होत नसल्याने रोप लागणीसाठी जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.