कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस; राधानगरी धरणातून विसर्ग सुरु, २४ बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 12:15 PM2024-07-04T12:15:03+5:302024-07-04T12:15:25+5:30
सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात बुधवारी दिवसभर उघडझाप असली तरी धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात २.९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी २४.३ फुटांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत तब्बल सव्वादोन फुटांनी वाढ झाली आहे. विविध नद्यांवरील २४ बंधारे पाण्याखाली गेल्या या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.
बुधवारी कोल्हापूर शहरात पावसाने काहीसी उसंत घेतल्याचे दिसले. पण, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात जास्त पाऊस आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ११०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असून, इतर धरणातून कमीअधिक प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळी झपाट्याने वाढ होत आहे.
काल, बुधवारी सकाळी ८ वाजता पंचगंगा नदीची पातळी २१.८ फुटापर्यंत होती, दिवसभरात म्हणजे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ती २४.२ फुटापर्यंत पोहोचली होती. सोळा बंधारे पाण्याखाली गेले असून, आज, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
पंधरा ‘सर्कल’मध्ये अतिवृष्टी
जिल्ह्यातील पंधरा सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे, कसबा वाळवे, गगनबावडा, साळवण, हेर्ले, चंदगड, बाजारभोगाव या सर्कलमध्ये धुवाधार पाऊस कोसळला आहे.
पडझडीत ३.६२ लाखांचे नुकसान
बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ३ खासगी मालमत्तांची अंशता पडझड झाली. यामध्ये ३ लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्ह्यातील २४ बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली व माणगांव, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी व हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव असे २४ बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा पुढीलप्रमाणे
राधानगरी २.९७ टीएमसी, तुळशी १.४७ टीएमसी, वारणा १३.२६ टीएमसी, दूधगंगा ५.८६ टीएमसी, कासारी १.०१ टीएमसी, कडवी १.३७ टीएमसी, कुंभी ०.९६ टीएमसी, पाटगाव १.८२ टीएमसी, चिकोत्रा ०.५२ टीएमसी, चित्री ०.७१ टीएमसी, जंगमहट्टी ०.६१ टीएमसी, घटप्रभा १.५६ टीएमसी, जांबरे ०.७६ टीएमसी, आंबेआहोळ ०.९१ टीएमसी, सर्फनाला ०.१२ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.१२ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी
राजाराम २६.४ फूट, सुर्वे २५.४ फूट, रुई ५५ फूट, इचलकरंजी ५२ फूट, तेरवाड ४५.९ फूट, शिरोळ ३६ फूट, नृसिंहवाडी ३३ फूट, राजापूर २२.९ फूट तर नजीकच्या सांगली १०.९ फूट व अंकली १४.२ फूट अशी आहे.
सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात
जिल्ह्यात काल दिवसभरात आजरा तालुक्यात सर्वाधिक ६४.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात २४ तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- १ मिमी, शिरोळ -०.५ मिमी, पन्हाळा- १३ मिमी, शाहुवाडी- १९.६ मिमी, राधानगरी- ४०.६ मिमी, गगनबावडा- ६३.८ मिमी, करवीर- ३.६ मिमी, कागल- ६.३ मिमी, गडहिंग्लज- १७.८ मिमी, भुदरगड- ५५ मिमी, आजरा- ६४.८ मिमी, चंदगड- ५८.९ मिमी, असा एकूण २२.२ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.